संदलची मिरवणूकही निघणार ; कव्वालीचा मुकाबला रंगणार
चुंचाळे, ता.यावल : येथून जवळच असलेल्या व सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गायरान येथे हजरत चाँदशाहली बाबांच्या यात्रोत्सव, सोमवार, 15 रोजी होत आहेत. सकाळी ढोल-ताश्यांच्या गजरात चादर चढवण्यात येणार असून दुपारी शावका बाबा यांच्या घरापासून संदल मिरवणुकीला सुरुवात होईल. गावातील सर्वच पवित्र दर्ग्यावर वादर व शेरणी हिंदू-मुस्लिम तडवी बांधवाच्या उपस्थितीत चढवली जाईल. संदल ही मुख्य चौकात आल्यावर येथील गैबनशाह बाबांच्या दर्ग्यापासून वाजत-गाजत गायराण येथील चाँदशाहवली बाबांच्या दर्ग्यावर पोहोचेल.
तडवी समाजातील उपवरांचे विवाह जुळतात
यात्रोत्सवादरम्यान तडवी समाजातील उपवर मुला-मुलींचे विवाह जुळतात.दर्गा परीसरातील मंदिरावर रोशनाई करण्यात आली आहे तसेच येथील शेतकरी एकनाथ दगडू पाटील यांनी दर्गा परीसरातील मंदिराना रंगरगोटी करून सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे. यात्रोत्सवानिमित्त हॉटेल्स तसेच खेळण्यांची दुकाने थाटण्यास सुरुवात झाली आहे. मानलेले नवस पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे शिवाय दूरवरून भाविक नवस फेडण्यासाठी येथे येतात. भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदू-मुस्लिम-तडवी पंच कमिटीने केले आहे. यात्रोत्सवात महाराष्ट्रासह परीसरातील भाविक हजारोच्या संख्येने येथे येतात.
अशी आहे आख्यायिका
हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानल्या जाणार्या हजरत चाँदशाहली बाबांच्या दर्ग्याची आख्यायिका अशी की येथील शावका बाबा यांच्यावर लहानपणापासूनच चाँदशाहली बाबांची कृपा छाया होती. शावका बाबांनी आपल्या भक्ताच्या सुख-दुःखासाठी चाँदशाहली बाबांची भक्ती केली. काही दिवसांनी शावका बाबा यांनी मनोमन इच्छा मागितली व ती पूर्ण झाली. तेव्हापासून शावका बाबा यांनी दर्गा बांधला तर 2013 पासून यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यंदा चौथे वर्ष आहे. हजरत चाँदशाहवली बाबा हे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात.
यात्रोत्सवाच्या दिवशी कव्वालीचे आयोजन
यात्रोत्सवाच्या रात्री कव्वालीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात कव्वाल सुलतान नाजा (पुणे) तर कव्वालन फरीना सुलतांना (कोल्हापूर) याच्यात कव्वालीचा मुकाबला रंगणार आहे. यावलवे पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील तायडे, विकास सोनवणे यांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.