कर्तव्यात कसुर केल्याचे प्रकरण भोवले
चोपडा । तालुक्यातील चुंचाळे येथील पोलीस पाटील गोकुळ धोंडू पाटील यांनी कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी अमळनेर उपविभागीय दंडाधिकारी यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चुंचाळे येथील पोलीस पाटील गोकुळ धोंडू पाटील यांनी गावात अवैध धंदे, दारु, सट्टा, जुगार तसेच अवैधरित्या झालेली वृक्षतोड, वाळू व मुरुम चोरी बाबत शासनाला अथवा संबंधित विभागाला माहिती दिली नाही. म्हणून गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रा.पं.सदस्य संजय नारायण महाजन यांनी पोलीस पाटील विरुद्ध तक्रारी अर्ज 7 जानेवारी 2018 रोजी दिला होता.
या तक्रारी अर्जाची चौकशी करुन संबंधित विभागाकडून स्वंय स्पष्ट अहवाल मागविणेत आले असता पोलीस पाटील गोकुळ धोंडू पाटील यांनी माहिती दिली नसल्याचा खुलासा त्या त्या विभागाने दिल्या असुन चोपडा शहर पोलीसात गोकुळ धोंडू पाटील यांच्यावर गुन्हा दाखल असुन सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत सदर पोलीस पाटील गोकुळ धोंडू पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश क्र. दंडप्र कावि 8/2019 उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर भाग अमळनेर यांनी 31 जानेवारी 19 रोजी लेखी पत्राद्वारे दिले आहेत. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 चे कालम 11 मधील तरतुदी नुसार सदरील आदेश देण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे.