ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेवरील अतिक्रमण भोवले
चोपडा(प्रतिनिधी) – तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना नुकतेच अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय महाजन यांच्या तक्रारीवरून विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी हा निकाल दिला आहे. दरम्यान या निकालामुळे चोपड्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,चुंचाळे येथील हरी जोतिराम पाटील यांचे ग्रामपंचायत घर क्र.४३१ सिटी सर्व्हे नं.६६१ चे बेकायदेशीर बांधकाम व ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेवर अतिक्रमण सुरू असल्याबाबत सरपंच/ग्रामविस्तार अधिकारी यांचेकडे दि.२७ फेब्रुवारी २०१७ रोजी सामाजिक कार्यकर्ते संजय नारायण महाजन यांनी लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र या बाबीकडे ग्रामपंचायतीने दूर्लक्ष करून हरी पाटील यांना अतिक्रमण बांधकामास संधी उपलब्ध करून दिली आहे अशी तक्रार संजय महाजन यांनी केली होती. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.जळगांव यांनी त्यांचे पत्रानुसार प्रस्तुत प्रकरणी चौकशी अहवाल सादर करून त्यात बेकायदेशीर केलेले अतिक्रमण बांधकाम काढून टाकणेबाबत टाळाटाळ केल्याचे प्रथमदर्शनी अहवाल सादर केला होता. या अहवालावर विभागीय आयुक्त नाशिक यांच्यासमोर वेळोवेळी सुनावणी ठेवण्यात आली होती. दि.३० जानेवारी रोजी अंतिम सुनावणी झाली होती.
नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी चुंचाळे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी अतिक्रमण बांधकाम काढून टाकण्याबाबत टाळाटाळ करून कर्तव्यात कसूर व हयगय कामी जबाबदार धरीत या प्रकरणी ग्रामपंचायत अपात्रता अपील क्र.४३/२०१८ महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम ३९(१) नुसार पदावरून सध्याच्या कालावधीसाठी अपात्र करण्याचे आदेश दि.१६ मार्च रोजी पारित केले. या निकालाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.जळगांव, गटविकास अधिकारी पं. स.चोपडा यांना पुढील कार्यवाही करीता देण्यात आली आहे. ग्रामपंचायत मध्ये एकुण १३ सदस्य संख्या असून यापूर्वी जात प्रमाणपत्र सादर न केल्याने शांताराम सपकाळे, रजनी सपकाळे, विश्वनाथ बाविस्कर हे तीन सद्स्य अपात्र झाले होते.तर आताच्या कारवाईत सरपंच अनिता संजय शिंदे(पाटील) उपसरपंच मनीषा अतुल पाटील,सदस्य दिवानजी साळुंखे, डॉ. भारती क्षिरसागर, मेघमाला पाटील,सायलिबाई बारेला, नंदलाल चौधरी, रत्नाबाई पाटील,धनराज पाटील हे सदस्य अपात्र झाले आहेत.तर ग्रा. पं. सदस्य संजय महाजन हे मुळ अर्जदार/तक्रारदार असल्याने ते पात्र सदस्य आहेत. तालुक्यात संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त होणारी ही पहिली ग्रामपंचायत असुन याविषयी चर्चेला उधाण आले आहे.