यावल। तालुक्यातील चुंचाळे येथे पुरुषांचे सार्वजनिक शौचालय नाही. यामुळे शासनातर्फे हागणदारी मुक्त अभियान राबवून देखील गावाच्या चारही बाजूने उघड्यावरील हागणदारी जैसे थे आहे. परिणामी सर्वत्र दुर्गंधी सुटून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चुंचाळे गावाची लोकसंख्या सुमारे 4 हजारापर्यंत आहे. एकीकडे हागणदारीमुक्तीसाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. त्यात वैयक्तिक शौचालय बांधकामाचा समावेश आहे. मात्र, चुंचाळेत पुरुषांच्या सार्वजनिक शौचालयाची गरज असूनही त्यादृष्टीने लोकप्रतिनिधी अथवा अधिकारी प्रयत्न करत नाहीत. परिणामी ग्रामस्थ गावाबाहेर उघड्या जागांचा शौचविधीसाठी वापर करतात. चुंचाळे ते नायगाव, किनगाव, साकळी, दहिगाव या रस्त्यानेदेखील उघड्यावर हागणदारी दिसते. विशेषत: रस्त्याने महिला-विद्यार्थीनींची ये-जा असताना त्यांनाही शरमेने माना खाली घालाव्या लागतात. यामुळे लोकप्रतिनिधी-प्रशासन दखल घेत नसेल तर गावातील तरुणांनी एकत्र येत श्रमदानातून सार्वजनिक शौचालय उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, अशी सूज्ञ नागरिकांची अपेक्षा आहे.