मुंबई – राज्यातील एसटी प्रवास मोफत या घोषणेने अनेक बसस्थानकांवर लोकांनी गर्दी केली होती. परिवहन मंत्री अनिल परब यांनी परराज्यातील मजुरांसाठी राज्याच्या सीमेपर्यंत नेणे आणि सीमेवरुन महाराष्ट्रातील लोकांना त्यांच्या जिल्ह्यात पोहचवणे यासाठी बससेवा मोफत असल्याचे सांगितले. मात्र अवघ्या काही तासात राज्य सरकारने याबाबतच्या निर्णयात बदल केला होता. यावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
आमदार नितेश राणेंनी ट्विट करुन म्हटले आहे की, चुकीची माहिती दिली आणि वांद्रे येथे गर्दी झाली म्हणून सरकारने एका पत्रकाराला तात्काळ अटक केली होती. आज चुकीची माहिती दिल्याने एसटी बस डेपो बाहेर गर्दी झाली मग ही माहिती देणारे मंत्री अनिल परब यांना अटक होणार का? असा सवाल करत याची मी वाट पाहतोय असा टोला शिवसेनेला लगावला आहे.