चुकीच्या जीवनशैलीने भविष्यात यकृताचा निकामी होण्याचा धोका

0

मुंबई । भविष्यात नागरिकांना यकृत निकामी होऊन विविध आजार होण्याची शक्यता असल्याचा इशारा डॉक्टरांनी जागतिक हेपटायटिस दिनानिमित्त नागरिकांना दिला आहे. विषाणूमुळे होणारा हेपटायटिस ही चिंतेची बाब होऊ लागली आहे. हा संसर्गजन्य रोगांचा समूह आहे. त्याला हेपटायटिस ए, बी, सी, डी आणि ई असे म्हणतात. बैठी जीवनशैली आणि मधुमेह, स्थूलपणा यासारखे विकार हे चरबीयुक्त यकृतासाठी कारणीभूत ठरू लागले आहेत. यकृताला इजा झाल्यामुळे हेपटायटिस होऊ शकतो किंवा कर्करोग होण्याचीही शक्यता असते. यकृताला इजा झाल्याने हेपटायटिस किंवा कर्करोग होऊ शकतो

बैठ्या जीवनशैलीचे वाईट परिणाम
झेन हॉस्पिटलचे संचालक आणि गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट डॉ. रॉय पाटणकर म्हणतात, बैठ्या जीवनशैलीमुळे यकृतामध्ये चरबी जमा होते. ही चरबी सामान्य प्रमाणापेक्षा 5 ते 10% अधिक असते. वेळेवर निदान आणि उपचार करण्यात आले तर यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

आरोग्यदायी जीवनशैलीची गरज
आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार आणि व्यायाम यामुळे यकृतावर होणार्या विपरित परिणामांपासून बचाव करता येऊ शकतो. याकडे दुर्लक्ष केल्यास चरबीयुक्त यकृत हे यकृताच्या कार्यशैलीमध्ये हस्तक्षेप करूनकायमचे नुकसान पोहचवू शकते. मधुमेहामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजची शक्यता वाढते.

हेपटायटिस आजाराची आकडेवारी
जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात 40 दशलक्ष व्यक्तींना हेपटायटिस बी या विकाराची लागण झालेली आहे आणि 6 ते 12 दशलक्ष व्यक्तींना गंभीर स्वरुपाचा हेपटायटिस सी झालेला आहे. गंभीर स्वरुपाचा हेपटायटिस असलेल्या व्यक्तींपैकी केवळ 5% व्यक्तींनाच या विकाराचा संसर्ग झाल्याची जाणीव आहे. यापैकी केवळ 1% व्यक्तींना यावरील उपचार उपलब्ध आहेत. हेपटायटस ई हा विषाणू संसर्गजन्य हेपटायटिससाठी कारणीभूत आहे. मुलांमध्ये बहुधा हेपटायटिस ए हा विषाणू आढळतो. यकृताला हेपटायटिस ई हा विषाणू कारणीभूत ठरतो.