20जूनही 2012 साली सत्यमेव जयते च्या एका एपिसोडमुळे स्त्रीलिंगनिदान आणि गर्भातच मुलींना मारण्याच्या कुप्रवृत्तीला घराघरात स्थान मिळालं होतं. तसा हा मुद्दा गेल्या तीसेक वर्षांपासून डोकं वर काढत होता. परंतू मध्ययुगीन मानसिकतेत वावरणार्या हिंदूस्तानी मानसिकतेने याकडे सपशेल कानाडोळा केला. सत्यमेव जयतेचा एपिसोड आला तेव्हा ते एक निमित्त होतं. त्याचे भयंकर परिणाम आज आपल्याला दिसत आहेत. पण त्यांना ओळखण्याची, ते वळण्याची बुद्धी आपण अजून कमावलेली नाही हे ही तितकेच सत्य आहे. पोरगी जन्माला येताच तीच्या नरड्याला नख लावणार्यांच्या देशात अजून फार काय बोलावं? मुलींच्या बाबतीत खुद्ध स्त्रियाही सापत्न वागतात. आणिबाणीच्या काळात लोकसंख्या वाढू नये म्हणून स्त्री गर्भालाच संपवण्याचा अमानुष प्रकार संजय गांधींकडून झाला होता. असो. मुद्दा वेगळा सांगायचा आहे. मी अनुभवलेले काही प्रसंग आहेत. पण एका मित्राने केलेल्या पुष्टीमुळे इथं मांडत आहे.आज महाराष्ट्रात मुलांना लग्नासाठी मुली मिळणे कठिण झालेले आहे. लग्न लावून देणाऱे समन्वयक (ही नवी जमात उदयास आलेली आहे) सध्या तेजीत आहेत. एका लग्नापाठी दोन लाख रुपये सहज कमावतात. त्यांचं काम असं चालतं… लग्नास इच्छुक असलेल्या मुलाला मुलगी सुचवणे, लवकरात लवकर लग्न पक्कं करणं, मध्यस्थी म्हणून बोलणी करणे आणि फी म्हणून मुलाकडून दोन लाख घेणं… तर अशाच अनेकांपैकी संबं
धितांतील एक केस.
समन्वयकाने मुलगी शोधली. मुलाला मुलगी पसंत पडली. बोलणी झाली. लग्न जवळ आलं. अशातच एक दिवस वरपक्षाने सरप्राईज व्हिजीट दिली वधुच्या घरी. तेव्हा वराच्या बापाने होणार्या वधूच्या अंगावर वर्षभराच्या पोराला पाजताना पाहीलं. बाप चिडला. समन्वयकानं समजावलं. हे स्थळ हातचं गेलं तर पुन्हा नवीन मिळणं कठिण होऊन बसेल. दोघांनीही आपापल्या मुठी झाकून ठेवा. तीचं मुल लांबच राहील. बापही गपगुमान तयार झाला. ही एकच केस आहे. असे अनेक समन्वयक ओळखीत आहेत. ते सांगतात… हा पर्सनल मामला असतो. लोक जाहीरपणे का बोलतील? पण मुली मिळणं आता कठिण झालेलं आहे. उपाशी तरणीबांड पोरं नजरेस पडतात. आपल्या असलेल्या लेकींसाठी सुद्धा भीती वाटून जाते. आता त्या समन्वयकाच्या बोलण्यातील भीती मला नीटशी समजली तरी नीट उमगली नाही.
त्यासाठी एका मुलीचा बाप होणं ही माझी शारिरीक, बौद्धिक, मानसिक गरज असावी. असो…मुलींना जन्मण्याआधीच मारण्याच्या प्रकारामुळे आपण किती मोठी चूक करून बसलो आहोत… याचा अंदाज अजूनही आपल्याला येत नाही आहे. त्या चुकीला सावरण्यासाठी आपल्याजवळ आता काहीही मार्ग नाही. जे आहे, ते चुपचाप सहन करण्यापलीकडे आपल्याजवळ पर्याय नाही.
– वैभव छाया