शिंदखेडा । शैक्षणिक उपक्रमांची माहिती राज्यातील सर्व शिक्षकांना अनुभवता यावी आणि विविध शैक्षणिक प्रयोगांचा अंगीकार करता यावा यासाठी राज्य शासन व महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे यांच्या मार्फत राज्यभर विभागस्तरावर राज्याचे प्रधान सचिव व शिक्षण मंत्री यांच्या शिक्षणाची वारी हा महत्वाकांक्षी उपक्रम साजरा होत आहे. यासाठी धुळे जिल्ह्यातून चुडाणे येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुनिल मोरे या उपक्रमशील शिक्षकाची निवड झाली आहे. मोरे यांना विभागीय स्तरावर लातूर, अमरावती, रत्नागिरी व नाशिक येथे सादरीकरणाची संधी मिळाली आहे. उपक्रमाची दखल शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतली आहे. आपल्या उपक्रमशीलतेतून मोरे यांनी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
700 कलाकृती
सुनिल मोरे यांनी नारळाच्या टाकाऊ करवंतीपासून कलाकृती निर्मिती केली आहे. टाकाऊ नारळापासून सौदर्यपूर्ण हस्तकलेची निर्मिती त्यांनी केली आहे. मोरे यांनी कोणतेही प्रशिक्षण घेतले नसून मॅन, मनगट आणि मेंदू यांचा सुंदर समन्वय साधून गेल्या 10 वर्षांपासून विविध 700 कलाकृती नारळाच्या टाकाऊ करवंटी पासून साकारल्या आहेत. निकड, चिकाटी आणि मेहनत यांच्या जोरावर त्यांचा हा अभिनव कलाविष्कार सध्या कलाप्रेमींसाठी चर्चेचा विषय बनला आहे.
कलाप्रेमींना मार्गदर्शन
मोरे यांनी महिला स्वयंसहाय्यता बचत गट, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना शिबीर, यातून सुमारे 700 कलाप्रेमीनां कार्यशाळेतून प्रशिक्षित केले आहे. ते ठिकठिकाणी प्रशिक्षण देत असतात. विविध प्रदर्शन, कार्यशाळा यासह सोशल मीडिया यांच्या माध्यमातून त्यांची हस्तकला सर्वदूर प्रसिद्ध झाली असून त्यांनी आपल्या कलाकृतींचे एक दालन आपल्या निवासस्थानी उभारले आहे.
अनेकांनी दिली भेट
विभागस्तरावर रत्नागिरी येथे नुकत्याच झालेल्या शिक्षण वारीत त्यांच्या स्टॉलला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी भेट देऊन त्यांचे विशेष कौतुक केले आहे. आतापर्यंतच्या लातूर, अमरावती, रत्नागिरी येथील शिक्षण वारीत त्यांच्या स्टॉलला विभागीय शिक्षण आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, संचालक डॉ.सुनील मगर, प्रा.शिक्षण संचालक चव्हाण, विभागीय विद्या प्राधिकरण संचालक जावळे, बालभारती पुणे विशेष अधिकारी प्राची साठे यांनी भेट दिली आहे. शिक्षण अधिकारी मोहन देसले, प्राचार्य विद्या पाटील, गटशिक्षण अधिकारी मनिष पवार आदींनी अभिनंदन केले आहे.