बोलता बोलून गेलो. समोर लोकं गावातील होती. त्यांच्यासाठी बोलावे लागते. त्यांना तशी भाषाच आवडते. तुम्हीच पाहा कशा टाळ्या वाजल्या. हंशाही पिकला. बोलता-बोलता चुकून बोललो. माझा हेतू तसा नव्हता. वगैरे वगैरे. अनेक खुलासे राजकारणी करतच असतात. आधी नको ते बोलून जातात. नंतर मग असे खुलासे करुन पांघरूनही टाकू पाहतात. पुन्हा ते पांघरून टाकतानाही ते लोकांच्या आवडी-निवडीच्या नावाने टाकतात. भाजपने दत्तक घेतलेले आमदार प्रशांत परिचारक यांनीही तसेच केले आहे.
विश्वमित्रांची तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्राने मेनकेसारख्या अप्सरेचा गैरवापर केला होता. सध्या राजकारणात देशसेवेची तपश्चर्या करणारे कमीच आहेत. आणि तसे आव आणणारेच भरपूर! जे तसा तपश्चर्येचा आव आणतात त्यांचा तो आवही गळून पडायला जास्त काही करावे लागत नाही. समोर माइक आणि थोडा-फार जनसमुदाय दिसला तर अशांपैकी अनेकांचा आव आपोआपच गळून पडतो. काय बोलू नी काय नको असे त्यांना होते. ते अगदी बोलण्यासाठी आतुर होतात. अगदी अनावर होऊन जाते त्यांना. आता या अशा बेताल नेत्यांना जर हे मांडायला सांगीतले ते म्हणतील, माइक आणि गर्दी दिसताच काहींची स्थिती भादव्यात कुत्रीला पाहून कुत्रे अनावर होतात, तशी होते! ते असे बोलतीलही मात्र अगदी ठरवले तरीही मी तसे लिहिणार नाही! काही मर्यादा या पाळायच्याच असतात. फक्त मर्यादा भंग करायचे ठरवले तर लोकांना झटकन कळतील अशा उपमा किती आणि कशा असतात ते दाखवण्यासाठीच भादव्यात पोहचलो!
पद्धतशीरपणे कार्यकर्ते, वक्ते घडवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने अशा प्रशांत परिचारकांना पुरस्कृत करणे सर्वांनाच आश्चर्याचे वाटले. पण धक्कादायक नाही. त्यांना परिसरात तोंडाचा फाटका नाही तर वाट्टेल ते बोलणारा म्हणूनच ओळखळे जाते. प्रचंड अंहकारी. लोकांची पर्वा नाही. जिभेवर नियंत्रण नाही, समोरच्याच्या वयाचे भान नसते. त्यामुळे लहानमोठा न पाहता वाट्टेल ते बोलायचे. पानउतारा करायचा. नसेल बसत प्रशांत परिचारकांचा स्वभाव आणि शैली भाजपच्या संस्कृतीत बसणारा! मग काय झाले! निवडून येणे हा निकष लावून सध्या उमेदवारी देणे सुरु आहे. त्यामुळे त्याच निकषात बसणाऱ्या प्रशांत परिचारकांना उमेदवारी देणे स्वाभाविकच!
सुधाकर पारिचारक हे प्रशांतरावांचे चुलते, विधानसभेला पडल्यानंतर त्यांनी पुढची बांधणी सुरु केली. विधानपरिषद निवडणुकीच्यावेळी चुलत्यांनी स्वत: मतदारसंघातील ज्येष्ठांना फोन केले. एकवेळ संधी द्या असा आर्जवे केली. त्यामुळे प्रशांत परिचारक आमदार झाले. आता ते त्याच लोकांना सुनावत आहेत. आता हे सुद्धा आमदारसाहेबांच्या भाषेत सांगायचे झाले तर या संपूर्ण परिसरात चुलते करुन गेले, प्रशांतराव आमदार झाले! मात्र हेही आम्ही बोलणार नाही. कारण लोकं हे जाणतात!
सोलापूर पट्ट्यातून निवडून आलेल्या प्रशांत परिचारक या आमदारसाहेबांचे नियंत्रण तसे नेहमीच सुटत असावे. ते सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील भोसे गावात गेले होते. तेथे पाण्याचा प्रश्न तसा गंभीरच. त्यामुळे पाणी कोणी पुरवले हा मोठा श्रेयाचा मुद्दा असतो. तेथे बोलायला लागताच आमदारसाहेबांच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला. खरेतर सभा होती, प्रचाराची. जिल्हा परिषदेला त्या गणातून उभ्या असलेल्या भाजप उमेदवाराच्या प्रचाराला आमदार परिचारक गेले होते. विधानसभेला त्यांना पाडणाऱ्या आमदार भालकेंवर त्यांचे खास प्रेम. साहजिकच कालव्यातून पाणी पुरवठा श्रेयावरून त्यांनी भालकेंना लक्ष्य केले.
पाणी कोणी दिले यावरून दोघेही भांडले असते तर काही हरकत नव्हती. ते जे म्हणाले ते खूपच आक्षेपार्ह. आमदार परिचारक राजकारण कसे असते ते सांगताना घसरले. म्हणजे चांगलेच घसरले. ते म्हणाले, “राजकारण कसे असते…पंजाब मधला सैनिक सीमेवर असताना त्याची बायको इकडे बाळंतीण होते. तुम्हाला मुलगा झाला अशी त्याला तार येते. वर्षभर तो गावाकडे गेलेला नसतो आणि तिथे तो पेढे वाटतो. लोक म्हणतात, काय झालं तो सांगतो मला मुलगा झाला. राजकारणही असेच आहे. करतो कोण. नाव कोणाचे.”
काल नको ते बोलून झाले. आज सगळीकडे त्यामुळे वाद निर्माण झाला आणि मग प्रशांतराव जागे झाले. बोलून तर गेले होते. करणार काय! त्यांनी खुलासा केला. वक्तव्याविषयी जाहीर माफी मागितली.
आता माफी मागीतली असली तरीही त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची आवश्यकता आहे. ते जे बाष्कळ बडबडले, त्यामुळे केवळ विनोद निर्माण झालेला नाही, तर उलट विकृतीची हद्द गाठली गेली आहे. स्वत:च्या देशाच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकांबद्दल विकृत बोलणे. हे वाटते तेवढे साधे बोलणे नाही. बोललेही असतील ते नेहमीप्रमाणे बेताल. पण सैनिकांचे त्यामुळे मनोधैर्य ढासळणार नाही का? तसेच कुंकू धोक्यात आणून पतीला सीमेवर लढू देणाऱ्या वीरपत्नींवर एवढे घृणास्पद लांछन आणखी काय असू शकते? मात्र उचलली जिभ लावली टाळ्याला तसे करत आमदारसाहेब वाट्टेल ते बरळले. ते बोलायचे ते बोलले. नंतर त्यांना उपरतीही झाली. मात्र भाजपने आता या आमदारमहोदयांना सांभाळून घेऊ नये. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. शेवटी एका आमदारापेक्षा देश मोठाच असतो!