दुबई । इंग्लंडमध्ये पुढील महिन्यात आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट, तसेच महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या आधीच मँचेस्टर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने गालबोट लागले आहे. या हल्ल्यात 22 जण मृत्युमुखी पडले असून या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था पुरविण्याची ग्वाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन 1 जूनपासून होत असून आयोजन स्थळांत मँचेस्टरचा समावेश नाही. लंडन, बर्मिंगहॅम आणि कार्डिफ येथे सामने खेळविले जातील. ‘आम्ही इसीबी आणि संबंधित अधिकार्यांची भेट घेत आपल्या सुरक्षा संचालनालयाने दिलेल्या निर्देशानुसार काम करू. या दोन्ही स्पर्धेदरम्यान कडेकोट सुरक्षाव्यवस्था प्रदान केली जाईल,’ असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केवळ आघाडीच्या संघांनाच प्रवेश देण्यात आला असल्याने या स्पर्धेतील चुरस वाढली आहे. ही स्पर्धा विश्वचषक स्पर्धेनंतर दुसरी महत्वाची स्पर्धा आहे. ही स्पर्धा जिंकण्याचाच भारतीय संघाचा निर्धार आहे. या स्पर्धेसाठी आयपीएलचा फायदा होणार आहे. संघातील अनेक खेळाडू सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून चॅम्पियन्स ट्रॉफी नक्की जिंकू.
विराट कोहली, कर्णधार, टीम इंडिया.
सुरक्षाव्यवस्थेची कडेकोट व्यवस्था
सुरक्षा अधिकार्यांना संभाव्य धोके लक्षात घेऊन सुरक्षाव्यवस्थेची समीक्षा करण्यास सांगण्यात आले आहे. अमेरिकन पॉप गायक एरियाना ग्रांडे यांचा कार्यक्रम सुरू असताना एरिनाबाहेर आत्मघाती बॉम्बस्फोट होऊन 22 जणांचा मृत्यू झाला. आयसीसीने मृतांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. 7 जुलै 2005 ला झालेल्या बॉम्बस्फोटानंतर ब्रिटनमध्ये झालेला हा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला आहे. यात 59 जण जखमी झाले. आयसीसीने वक्तव्यात म्हटले आहे, की जे लोक हल्ल्यात मारले गेले आणि जखमी झाले त्यांच्यासोबत आहोत. आयसीसी आणि इसीबी यंदा येथे आयोजित दोन मोठ्या स्पर्धांना कडेकोट सुरक्षा प्रदान करण्यास कटिबद्ध आहे. तथापि निश्चित धोरणांतर्गत सुरक्षाव्यवस्थेचा खुलासा करू शकत नाही. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 24 जून ते 23 जुलै या कालावधीत होईल.
ऑस्ट्रेलिया दोनदा चॅम्पियन्स!
आयसीसीकडून आयोजित करण्यात येणारी चॅम्पियन करंडक स्पर्धा ही विश्वचषकानंतरची सर्वात मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेला मिनी विश्वचषक म्हणून ही ओळखले जाते. आयसीच्या आठव्यांदा रंगणार्या स्पर्धेत क्रमवारीत अव्वल आठ संघ सहभागी झाले आहेत. या आठ संघाचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. भारतीय संघ ब गटात खेळताना दिसणार असून या गटात त्यांना पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका या संघाचे आव्हान असेल. तर अ गटात इंग्लड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. सात वेळा झालेल्या या स्पर्धेत द. आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि भारताने प्रत्येकी एक वेळा ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. ऑस्ट्रेलियाने दोन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.