दुबई । आयपीएलच्या महासंग्रामानंतर भारतीय संघाला व्यस्त वेळापत्रकाला सामोरे जावे लागणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौर्यावर जाणार आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने भारताच्या वेस्ट इंडिज दौर्याचे वेळापत्रक केले आहे. वेळापत्रकानुसार, वेस्ट इंडिजसोबत भारत पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार असून, या दौर्यात दोन्ही संघामध्ये एक टी-ट्वेंटी सामना देखील खेळविण्यात येणार आहे. 1 ते 18 जून या दरम्यान चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर लगेच 23 जूनपासून भारताच्या वेस्ट इंडिज दौर्याला सुरुवात होईल. या दौर्यातील अखेरचा टी-ट्वेटी सामना 9 जुलैला खेळविला जाणार आहे. वेस्ट इंडिज दौर्यातील पहिले दोन सामने पोर्ट ऑफ स्पेनच्या क्विन पार्क मैदानावर खेळविण्यात येणार असून, तिसरा आणि चौथा सामना हा सर व्हिव रिचर्डस अँटिगामध्ये रंगणार आहे. एकदिवसीय मालिकेतील अखेरचा आणि एकमेव टी-ट्वेटी सामना जमैकाच्या सबिना पार्क मैदानावर खेळविण्यात येईल. वेस्ट इंडिज दौर्यावर काही सिनियर खेळाडूंना बीसीसीआय विश्रांती देण्याची शक्यता आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ आयसीसी क्रमवारीत अव्वल आठमध्ये नसल्यामुळे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत पात्र ठरलेला नाही.
महिला संघाचे अभिनंदन
नवी दिल्ली । दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या चार देशांच्या मालिकेत विक्रमी कामगिरी करणार्या भारतीय महिला संघाचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अभिनंदन केले. दीप्ती शर्मा व पूनम राऊत यांनी आयर्लंडविरुद्धच्या लढतीत विक्रमी भागीदारी नोंदवली. बोर्डाचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी ’भारतीय महिला संघाने विक्रमी कामगिरी केली आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो.’ असे म्हणत कौतुकाची थाप दिली आहे. चौधरी पुढे म्हणाले,‘याची सुरुवात झुलन गोस्वामीने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज म्हणून नोंदवलेल्या विक्रमाने झाली. दीप्ती व पूनम 300 धावांची भागीदारी करणारी पहिली महिला जोडी ठरली.’ या दोघींनी आयर्लंडविरुद्धच्या लढतीत 45.3 षटकांत 320 धावांची भागीदारी केली. दीप्तीने 160 चेंडूंना सामोरे जाताना 188 धावा केल्या. महिला क्रिकेटमध्ये ही दुसरी सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली तर वन-डेमध्ये भारतीय महिला खेळाडूंमध्ये ही सर्वोच्च खेळी आहे. संघाच्या या खेळीमुळे सोशल मिडीयावर देखील संघाचे चाहते आणि क्रीडाप्रेमी भरभरून अभिनंदन करत आहेत.
आयपीएलमुळे गोलंदाज अपूर्ण!
आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमामुळे नियमित नेट प्रॅक्टिसची संधी मिळत नसल्यामुळे गोलंदाज एकदिवसीय सामन्यांसाठी अपूर्ण आहेत असे मत न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँडने व्यक्त केले. आघाडीचे आंतरराष्ट्रीय गोलंदाज पुढील महिन्यात खेळल्या जाणार्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अपूर्ण तयारीने जाणार आहेत, असेही बाँड म्हणाला. बाँडने म्हटले आहे की, आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमामुळे गोलंदाजांना नेट्समध्ये नियमित सराव करता आला नाही. गोलंदाजांना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी स्वत:ला तयार करताना अडचण भासेल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आघाडीच्या गोलंदाजांना 10 षटकांचा कोटा पूर्ण करावा लागतो. पण आयपीएलमध्ये त्याची त्यांना सवय नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्यांना कोटा पूर्ण करताना अडचण भासेल. 20 षटकांच्या क्रिकेटनंतर 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये सहभागी होताना खेळाडूंना अधिक मेहनत घ्यावी लागेल. इंग्लंड व वेल्समध्ये होणारी स्पर्धा आयपीएलपेक्षा वेगळी आहे, असे तो म्हणाला.
विंडीजमधील सामन्याचे वेळापत्रक
शुक्रवार 23 जून, पहिला एकदिवसीय सामना, क्विन्स पार्क ओव्हल
रविवार 25 जून, दुसरा एकदिवसीय सामना, क्विन्स पार्क ओव्हल
शुक्रवार 30 जून, तिसरा एकदिवसीय सामना, सर व्हिव रिचर्डस स्टेडिअम
रविवार 2 जुलै, चौथा एकदिवसीय सामना, सर व्हिव रिचर्डस स्टेडिअम
गुरुवार 6 जुलै, पाचवा एकदिवसीय सामना, सबिना पार्क
रविवार 9 जुलै, टी-ट्वेटी सामना, सबिना पार्क