मुंबई। महसुलातील हिस्सेदारीवरुन आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात सुरु असलेला वाद विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. आयसीसीच्या नियमानुसार 25 एप्रिलपर्यंत संभाव्य संघाची घोषणा करायचे असूनही टीम इंडियाने आपल्या संभाव्य 15 खेळाडूंची यादी आयसीसीकडे अद्याप पाठवली नसल्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतून भारत माघार घेण्याची शक्यता वाढली आहे. एक जून पासून इंग्लडंमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 8 संघांमध्ये रंगणार असून याचे वेळापत्रक देखील जाहीर झाले आहे. आयसीसी बीसीसीआयला देण्यात येणारा महसुलातील हिस्सा कमी करण्याच्या तयारीत आहे. यामुळे बीसीसीआय नाराज आहे.
तीन देशांना सर्वाधिक हिस्सा
भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन देशांना आयसीसीकडून महसुलातील सर्वाधिक हिस्सा मिळतो. या तिन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाला कोणताही निर्णय घेताना महत्त्व दिले जाते. आयसीसीने जर या निर्णयात बदल केला तर या तिन्ही बोर्डांचे मोठे नुकसान होणार असल्याने बीसीसीआयने आक्रमक भूमिका घेतली आहे. बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासाठी इंग्लंडला मिळणार्या 13.5 कोटी डॉलर (जवळपास 895 कोटी रुपये) या रकमेवरही आक्षेप घेतला आहे. बीसीसीआयने म्हटले की, या वर्षी टी-20 वर्ल्डकपच्या 58 सामन्यांच्या (पुरुष आणि महिला मिळून) आयोजनासाठी 4.5 कोटी डॉलर (298 कोटी रुपये) इतकी रक्कम मिळाली, तर इंग्लंडला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या केवळ 15 सामन्यांसाठी 895 कोटी रुपये देण्यात आले.
आयसीसीला सर्वाधिक महसूल भारतातून!
भारतात झालेल्या आयसीसी टी-20 वर्ल्डकप सामन्यांच्या तुलनेत इंग्लंडमध्ये होणार्या सामन्यांची संख्या अर्ध्यापेक्षा कमी आहे. क्रिकेटमध्ये 70 ते 75 टक्के रेव्हेन्यू भारतातून तयार होतो. अशात भारताला दुर्लक्षित करून आयसीसी कोणताही मोठा निर्णय कसा काय घेऊ शकते, हे बीसीसीआयला दाखवायचे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडण्याची धमकी किंवा यात दुबळी टीम खेळवण्याचे सांगून बीसीसीआयने पॉवर-पॉलिटिक्समध्ये पूर्ण ताकद लावली आहे. पुढच्या काही महिन्यांत याचे परिणाम दिसतील. आयसीसीच्या प्रमुख समित्यामध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व वाढण्याची दाट शक्यता आहे.
7 देशांच्या संघांची घोषणा
इंग्लंडमध्ये 1 जून ते 18 जून 2017 दरम्यान होणार्या स्पर्धेसाठी 8 संघ निश्चित झाले आहेत. एकूण 15 सामने होणार आहेत. त्यासाठी 2 गट पाडण्यात आले असून, प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरी गाठतील. अंतिम सामना 18 जून रोजी ओव्हेल मैदानात होईल. ऑस्ट्रेलिया, यजमान इंग्लंड, बांगलादेश, आणि न्यूझीलंड यांचा अ गटात समावेश आहे. तर ब गटामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि द. आफ्रिका संघाचा समावेश आहे. स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात एक जून रोजी ओव्हल येथे होणार आहे. भारताशिवाय अन्य सात संघानी आपल्या संघाची घोषणा केलेली आहे. द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लड , श्रीलंका आणि बांगलादेश यांनी आपल्या संभाव्य संघाची घोषणा केली आहे.