नवी दिल्ली । निवडणुकीसाठी वापरण्यात येत असलेल्या मतदान यंत्रात होणारी छेडछाड सिद्ध करा, असे आव्हान निवडणूक आयोगाने दिल्यानंतर काँग्रेससह बहुतांश राजकीय पक्षांनी या ईव्हीएम हॅकिंग चॅलेंजपासून दूर राहण्याचा विचार सुरू केला आहे. तर इव्हीएम हॅक करण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणतीही अट वा नियम ठेवू नये, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
3 जूनपासून हॅक करून दाखवण्याची मुभा
गेल्या वर्षभरात देशात झालेल्या बहुसंख्य निवडणुकात भाजपाला मिळालेल्या विजयानंतर अनेक राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी वापरण्यात येत असलेल्या एतच वर संशय घेण्यात येत होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेविषयी वारंवार स्पष्टीकरण दिल्यानंतरही या पक्षांचे समाधान झाले नव्हते. त्यानंतर निवडणूक आयोगाने आपल्याकडील मतदान यंत्र हॅक करण्याचे आव्हान राजकीय पक्षांना दिले होते. या आव्हानांतर्गत 3 जूनपासून राजकीय पक्षांचे प्रतिनिधी निवडणूक आयोगाकडे असलेल्या ईव्हीएम हॅक करण्यासाठी प्रयत्न करू शकतील.
कुठल्याही अटी वा नियम ठेवण्यात येऊ नये
इव्हीएम हॅकिंगसाठी दिलेल्या आव्हानाबाबत आम आदमी पक्षाचे शिष्टमंडळ मंगळवारी निवडणूक आयोगाला भेटले. यावेळी ईव्हीएम हॅकिंगसाठी दिलेल्या आव्हानासाठी कुठल्याही अटी वा नियम ठेवण्यात येऊ नये तसेच या हॅकिंगला खुले ठेवण्यात यावे जेणेकरून मशीनमधील छेडछाडीचा डेमो दाखवता येईल. असे आम आदमी पक्षाने सांगितले.
काँग्रेस याप्रकरणी दूरच राहणार
काँग्रेसने मात्र या आव्हानाबावत सावध प्रतिक्रिया दिली आहे. या आव्हानापासून दूर राहण्याचा पक्षाचा विचार आहे, असे काँग्रेसमधील एका वरिष्ठ सूत्राने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक करण्यासाठी दिलेल्या आव्हानाच्या प्रक्रियेत काही अटी घातल्या आहेत. त्या अटींनुसार राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना तांत्रिक व्यवस्थेच्या चौकटीत राहून ईव्हीएममध्ये छेडछाड करावी लागणार आहे.