चेंबूरमध्ये नरेड्कोतर्फे अमृता फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपण

0
मुंबई (रुपेश दळवी) – महाराष्ट्र सरकारच्या वनविभागाकडून 1 ते 7 जुलै या काळात राज्यभर 4 करोड रोपं लावण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यालाच अनुसरून येत्या 7 जुलैपर्यंत महाराष्ट्रभर 4 करोड रोपं लावण्याचा उपक्रमाला नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊंसिल (नरेड्को) ने साथ दिली आहे. रविवारी चेंबूरमधील प्रियदर्शिनी पार्क परिसरातील मॉंसाहेब मीनाताई ठाकरे वनस्पती उद्यान इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फ़डणवीस यांच्या हस्ते 1 लाख रोपं लावण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
मुंबईत 1 लाख रोपं लावण्यात आली. यावेळी अमृता फडणवीस यांच्यासह त्यांची मुलगीही उपस्थित होती. तसेच नरेड्को पश्चिम विभागाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, उपाध्यक्ष राजन बांदेलकर, प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड व अनेक मान्यवर उपस्थित होते. ही रोपं केवळ लावून भागणार नाही, तर त्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे असे यावेळी अमृता फडणवीस यांनी म्हटले. 2018 मध्ये 13 कोटी झाडे लावण्याचे उद्दीष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. 5 जुलैला नरेड्कोतर्फे कल्याणमध्येही युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेच्या हस्ते वृक्षारोपण होणार आहे.