चेंबूरमध्ये पुन्हा झाड कोसळून झाला महिलेचा मृत्यू

0

मुंबई । मुंबईच्या चेंबूर परिसरात गुरूवारी अंगावर झाड पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. शारदा घोडेस्वार असे या मृत महिलेचे नाव आहे. शारदा घोडेस्वार या पांजरापोळ येथील रहिवासी आहेत. त्या बसस्टॉपवर उभ्या असताना हा प्रकार घडला. यावेळी झाडाचा काही भाग त्यांच्या डोक्यावर कोसळला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर शारदा यांना जखमी अवस्थेत शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याआधी चेंबूरमधील स्वस्तिक पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या कांचन नाथ यांचा झाड पडून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा पालिकेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

यापूर्वी चेंबूरमध्ये जुलै महिन्यात कांचन नाथ या मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांच्या अंगावर नारळाचे झाड पडले होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी पालिकेने जोरदार वार्‍यांमुळे झाड पडल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली होती. मात्र, दुर्घटना घडली त्या परिसरातील चंद्रोदय सोसायटीचे रहिवासी अविनाश पोळ यांनी मुंबई महानगरपालिकेकडे या झाडाबाबतची तक्रार फेब्रुवारी महिन्यात केली होती. ते झाड कापण्याची फी 1380 रु. त्यांनी भरली होती. त्यावर पालिकेच्या पथकाने पाहणी करून झाड सुस्थितीत असून तोडण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे कांचन यांच्या मृत्यूस पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप रहिवाश्यांनी केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अशाप्रकारची दुर्घटना घडल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.