चेंबूर येथील टिळकनगर महालक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्थेची गैरव्यहाराची चौकशी करणार – रविंद्र वायकर

0

मुंबई | म्हाडाबरोबर केलेल्या कराराचे तसेच म्हाडाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चेंबूर येथील टिळकनगर महालक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्थेची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी शुक्रवारी दिली.

याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना वायकर बोलत होते.

वायकर म्हणाले, विधानमंडळ सुरक्षा अधिकारी कर्मचारी सहकारी संस्थेला टिळक नगर येथे भूखंडाचे वाटप करण्यात आले होते. या भूखंड वापरासंदर्भात म्हाडा व संस्थेमध्ये भाडेपट्टा करार करण्यात आला. या संस्थेने टिळक नगर महालक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्था अशी नोंदणी करून या भूखंडावर इमारत बांधली. करारानुसार या इमारतीमधील दहा टक्के सदनिका या शासन नामनिर्देशित शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आरक्षित ठेवणे, तसेच दहा टक्के सदनिका म्हाडाच्या/शासनाच्या ताब्यात देणे आवश्यक होते. परंतु संस्थेने या नियमांचे उल्लंघन केले तसेच शासन अथवा म्हाडाची परवानगी न घेता भूखंडाची परस्पर विक्री करण्यात आल्याचे निदर्शनास आले. संस्थेच्या व तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या या अनियमिततेविरुद्ध व शासन/म्हाडाची फसवणूक केल्याप्रकरणी टिळक नगर, चेंबूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही वायकर यांनी सांगितले.