चेक गणराज्यातल्या बॉक्सींग स्पर्धेत भारताला आठ पदके

0

प्राग । येथे सुरू असलेल्या 48व्या ‘ग्रंड प्रीक्स उस्ती नाद लाबेम’ या स्पर्धेत शिवा थापा याने 60 तर मनोजकुमार याने 69 किलोग्रॅम वजनगटात सुवर्णपदक पटकावले. यासोबत भारतीय बॉक्सर्सनी या स्पर्धेत एकंदरीत पाच सुवर्ण, दोन रौप्य तर एक कांस्य असे एकंदरीत आठ पदके मिळवली.

दोघांचा झंझावात
शिवा थापा याने अलीकडेच आशियाई चँपियनशीप स्पर्धेत रौप्य पदक मिळवले होते. याशिवाय त्याने आधी वर्ल्ड चँपियनशीपमध्ये ब्राँझ तर राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्याने चेक रिपब्लीकमधील 60 किलोग्रॅम वजनाच्या गटात अंतिम फेरीत स्लाव्हाकियाच्या फिलीप मेसझॉरस याला 5-0 शून्य अशा फरकाने दणदणीत लोळवत विजेतेपद पटकावले आहे. तर मनोजकुमार याने 69 किलोग्रॅम वजनी गटात चेक रिपब्लीकच्याच डेव्हिड कोट्रॅकचा दारूण पराभव केला.

उज्ज्वल कामगिरी
भारतीय चमूने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. अमित फंगल (52 कि.ग्रा.), गौरव बिधुरी (56 कि.ग्रा.) आणि सतीश कुमार (91 कि.ग्रा.) यांनीदेखील सुवर्णपदके पटकावली. शनिवारी रात्री उशीरा हे सामने झाले. तर मनीष याला जर्मनीच्या इब्रागिम बाझुइव्ह याने मात देत विजेतेपद मिळवले. अर्थात मनीषला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारतीय बॉक्सर्सची ही कामगिरी त्यांच्या आत्मविश्‍वास उंचावणारी ठरली आहे. आगामी काळातील विविध स्पर्धांमध्ये यामुळे संघ अधिक सकारात्मक पध्दतीने कामगिरी करेल असा आशावाद यातून निर्माण झाला आहे.