चेक बाऊंस झाल्याने धनंजय मुंडे अडचणीत; डिसेंबर नंतर चार्जशीट दाखल होणार

0

मुंबई- विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढ होण्याची चिन्हे आहेत. जगमित्र साखर कारखान्यास दिलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून दिलेला ४० लाख रूपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात डिसेंबरपर्यंत दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. राज्य सरकारने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर ही माहिती दिली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पुस(जि. बीड) येथील गीते यांची जमीन ५० लाख रुपयांत घेण्यात आली. जमिनीचे खरेदीखत ७ जून २०१२ रोजी करण्यात आले. गीते यांचा मुलगा बाळासाहेब, भावाची मुले राजाभाऊ व प्रभाकर आणि नातू आत्माराम यांना साखर कारखान्यात नोकरी देण्याची हमी देण्यात आली होती. मुलगा, नातू आणि भावाच्या दोन मुलांना दर महिन्याला तीन हजार रूपयांप्रमाणे सहा महिने काम देऊन पगार दिलेला आहे.

जमिनीच्या व्यवहारात ठरल्याप्रमणे प्रथम एक लाख व नंतर ७ लाख ८१ हजार २५० रूपयांचा धनादेश दिला. परळीच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रचा धनंजय मुंडे यांनी ४० लाख रूपयांचा धनादेश दिला. गीते यांना दिलेला धनादेश न वटताच परत आला आणि तीन वर्षे पाठपुरावा करूनही रक्कम देण्यात आली नाही. शेवटी गीते यांनी पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. याविरोधात अॅड. व्ही. डी. गुणाले यांच्यावतीने गीते यांनी खंडपीठात धाव घेतली असता खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

खंडपीठाच्या आदेशानंतर गीते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधानातील ४२० (फसवणूक) व ३४ नुसार बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जगमित्र कारखान्यासाठी इतरही लोकांनी जमिनी दिलेल्या असून त्यांचेही संमतीपत्र तपासण्यात येत असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. प्रकरणात कारवाई होत नसल्याने शेतकरी गीते यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. खंडपीठाने दोषारोपपत्र किती दिवसात दाखल केले जाईल अशी विचारणा केली असता डिसेंबर २०१८ पर्यंत दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. व्ही. डी. गुणाले यांनी काम पाहिले तर शासनातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अतुल काळे यांनी बाजू मांडली.