‘चेतकोत्सव एक अभिनव यात्रा’ चित्रकला स्पर्धा

0

शहादा । तालुक्यातील सारंगखेडा येथील अश्‍वयात्रेसाठी प्रसिध्द असलेल्या एकमुखी दत्तप्रभू यात्रेनिमित्त चेतक फेस्टीव्हलच्या माध्यमातून चेतकोत्सव एक अभिनव यात्रा या विषयावर राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संपुर्ण महाराष्ट्रात घोडेबाजारासाठी प्रसिध्द असलेल्या सारंगखेडा येथील एकमुखी दत्तप्रभुंच्या यात्रेस येत्या 3 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. प्रशासन व ग्रामपंचायतीच्यावतीने यात्रोत्सवाची पुर्वतयारी सुरु झाली असून गत काही वर्षांपासून यात्रेदरम्यान प्रसाद सेवाभावी संस्थेच्यांवतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. गत वर्षापासून पर्यटन विकास महामंडळ तसेच चेतक फेस्टीव्हल समितीमार्फत अश्‍वस्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात येत असून या वर्षी चेतकोत्सव एक अभिनव यात्रा या विषयावर पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चेतक फेस्टिव्हल समितीतर्फे विविध कला गुणांनावाव मिळावा म्हणून सांस्कृतिक महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात चित्रकलेचा समावेश करण्यात आला असून यात्रोत्सवात खरेदी विक्रीसाठी आलेले अश्‍व, अश्‍वांचे देखणे रुप, वैशिष्टे, हालचाली आदि टिपून जनसामान्यांपावेतो पोहचावेत या हेतूने पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

7 डिसेंबर रोजी बक्षीस वितरण
स्पर्धेचा विषय ’चेतकोत्सव एक अभिनव यात्रा’ हा असून अर्धा माऊंट बोर्डवर स्पर्धकाने आवडीनूसार विविध रंगात कोलाज कामासह रंगवलेले पोस्टर सादर करावयाचे आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून यशस्वी स्पर्धकांना रुपये 25 हजार प्रथम, रुपये 20 हजार द्वितीय, रुपये 15 हजार तृतीय तसेच उत्तेजनार्थ पाच हजाराचे पाच बक्षिसांचा समोवश आहे. येत्या 2 डिसेंबर पावेतो चेतक फेस्टिव्हल समितीकडे पोस्टर जमा करणे अनिवार्य आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण दि.7 डिसेंबर रोजी होणार असून त्याच दिवशी पोस्टर प्रदर्शन भरविण्यात येईल. या पोस्टरवर एक संदेश असणे व पोस्टर घोड्यांशी संबंधी असणे आवश्यक आहे. एक स्पर्धेक दोन पोस्टर सादर करु शकेल. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार असून सदर पोस्टर पर्यटन विभागाकडे संग्रहीत केले जाणार आहे. स्पर्धेसाठी परिक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. चतुर्भुज शिंदे, राजेंद्र राजपूत, निलेश पाटील यांच्याशी संपर्क साधावा.