चेन्नईतला करुणानिधी

0

गेल्या महिन्यात मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या पूर्ततेनिमित्त भाजपने मोठा सोहळा योजला होता, तर तेच निमित्त साधून काँग्रेस अध्यक्षा सोनियांनी दिल्लीत विरोधी पक्षाच्या नेत्यांची एक संयुक्त बैठक बोलावली. त्यातून पुढल्या लोकसभेसाठी मोदी विरोधात बडी आघाडी निर्माण करण्याचे सुतोवाच करण्यात आलेले होते. पण त्यात कोण हजर होते आणि कोण गैरहजर होते, त्याचीच जास्ती चर्चा झाली व विषय मागे पडला. आता त्याला दोन आठवडे होत असताना दक्षिणेत चेन्नई येथे द्रमुक पक्षाचे ज्येष्ठ नेते व देशातील सर्वात जुने हयात माजी मुख्यमंत्री करुणानिधी, यांच्या वाढदिवसाचे निमित्त करून आणखी एकदा विरोधी एकजुटीचा डंका पिटण्यात आला आहे. यातली गंमत अशी, की त्या कार्यक्रमासाठी तमाम पराभूतांनी हजेरी लावलेली होती. ज्यांच्याविषयी मनात करुणा निर्माण व्हावी, अशा लोकांचा मेळावा म्हणजे राजकीय निधीच म्हणायचा ना? पुढल्या महिन्यात देशाच्या भावी राष्ट्रपतींची निवडणूक व्हायची आहे. त्यात हे सर्व विरोधक एकत्र येऊन काय दिवे लावू शकणार आहेत? त्यांची मते मोदींना आपला उमेदवार निवडून आणण्यापासून रोखू शकत नाहीत. मग अशा बैठका वा सभांमधून काय साधले जाणार आहे? अशा गोतावळ्यामध्येच काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व तरुण नेते उमर अब्दुल्ला यांचाही समावेश होता. यासारखा दुसरा विनोद असू शकत नाही. आपण दोन महिन्यांपूर्वी काय बोललो, त्याचेही स्मरण या तरुण नेत्याला नाही आणि विस्मृतीच्या वयात गेलेल्या सर्वात वृद्ध नेत्याच्या वाढदिवसाला उमर अब्दुल्ला हजेरी लावतात. म्हणूनच मग तिथे काय बोलले गेले व ते कोणाला किती कळले असेल, याचीच शंका येते. कशासाठी जमलो आहोत आणि त्यातून काय साध्य होऊ शकेल, याचाही यापैकी कोणाला थांगपत्ता नसावा. बाकीचे सोडा, उमर अब्दुल्ला यांना तरी 23 फेब्रुवारीला ते काय म्हणाले त्याचे स्मरण आहे काय?

23 फेब्रुवारी 2017 रोजी देशातील पाच विधानसभांच्या मतदानाची मोजणी झालेली होती. त्यात उत्तर प्रदेश सर्वात मोठे व देशातील प्रमुख राज्य आहे. मागल्या लोकसभा मतदानात भाजपने तिथेच मोठी बाजी मारलेली होती. साहजिकच तिथे आपली लोकप्रियता टिकून असल्याचे सिद्ध करणे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरचे मोठे आव्हान होते. त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावून ते आव्हान पेलले आणि काँग्रेस समाजवादी यांनी आघाडी केलेली असतानाही अपूर्व बहुमत संपादन करून दाखवले. त्या निकालात विरोधकांची इतकी धूळधाण उडालेली होती, की काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी श्रीनगरात आपली पाचही बोटे तोंडात घातली होती. त्यावर जाहीर प्रतिक्रिया देताना उमर म्हणाले होते, विरोधी मित्रांनो, 2019 सालच्या लोकसभा निवडणुका विसरून जा! आता थेट 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागा. याचा अर्थ काय होतो? उत्तर प्रदेशात तीन वर्षे उलटत आली असतानाही मोदी इतक्या मोठ्या प्रमाणात मते व जागा जिंकत असतील, तर आणखी दोन वर्षांत येऊ घातलेल्या लोकसभा मतदानात मोदींना पराभूत करणे केवळ अशक्य आहे. याचीच जाहीर कबुली उमर यांनी दिली होती. ती त्यांनी केलेली गंमत होती काय? नसेल तर आता त्यांनी चेन्नईत करुणानिधीमध्ये कुठली देणगी जमा केलेली आहे? ती बैठक 2024 च्या लोकसभेसाठी होती असा उमर अब्दुल्ला यांचा समज होता काय? नसेल तर 2019 च्या गप्पा कसल्या मारता, असाच सवाल तिथे पोपटपंची करणार्‍यांना उमरनी विचारायला हवा होता. पण तसे काहीही झाले नाही. कारण तिथे जमा झालेले एकाहून एक पराभूत नेते विजेत्या मोदींना हरवण्याच्या गर्जना करीत होते.

यांसारखा म्हणूनच अन्य कुठला विनोद असू शकत नाही. एका व्यासपीठावर जमा होऊन डरकाळ्या फोडल्याने निवडणुका जिंकता येत नसतात, हे यांना कधी कळणार आहे? ज्या उत्तरप्रदेशी निकालांनी उमर अब्दुल्ला इतके प्रभावित झालेले होते, तिथे राहुल वा अखिलेशला पराभूत होण्यासाठी मैदानात उतरले होते काय? सहासात महिने आधीच राहुल गांधी एका नव्या रणनीतीकाराला हाताशी धरून त्या मैदानात उतरले होते. प्रशांत किशोर नामक नव्या युगाच्या निवडणूक व्यवस्थापकाला काम सोपवून राहुलनी उत्तर प्रदेशची मोहीम आखलेली होती. मग पुढल्या काळात प्रशांतने रणनीती आखावी आणि राहुलने ती उधळून लावावी, असा खेळ चालू राहिला होता. अखेरीस राहुल एकटा काही करणे अशक्य वाटल्याने प्रशांत किशोरने समाजवादी पक्षाशी युती करण्याचे प्रयास आरंभले होते, तर अनेक काँग्रेस नेत्यांनी प्रशांतची खूप निर्भर्त्सना केलेली होती. पण अखेरीस भरपूर खोळंबा केल्यावर तशी युती करण्यात आली आणि काँग्रेसने आपले घरटे वाचवण्यासाठी समाजवादी पक्षाचाही सत्यानाश करून टाकला. इतके महिने आधी तयारी करून काँग्रेसने आपल्या बरोबर आलेल्यांनाही मातीमोल करून टाकले. तेच राहुलनी बंगालमध्ये ममता विरोधात डाव्यांशी युती करून साधलेले होते. तिथे ममताला हरवणे साधले नाही. पण काँग्रेस सोबत जाऊन डावी आघाडी पुरती धुळीस मिळाली आहे. आज त्यांना आपला एक सदस्य राज्यसभेत जिंकून आणण्याचीही क्षमता उरलेली नाही. अशा काँग्रेसला सोबत घेऊन चेन्नईत जमलेले नेते कुठली बाजी मारणार, त्याचा आपल्याला सहज अंदाज बांधता येतो. म्हणूनच मुद्दाम उमर अब्दुल्लांना त्यांच्या विधानाचे स्मरण करून देण्याची गरज भासली. सत्याकडे पाठ फिरवून जे परिवर्तन घडवू बघतात, त्यांना स्वत:लाही बदलता येत नाही, की इतरांना बदलता येत नाही अन्यथा राहुलनी व काँग्रेसने त्यांच्यातल्याच भविष्यवेत्त्याकडे पाठ फिरवली नसती आणि आत्मनाश ओढवून आणला नसता. 2014 च्या लोकसभेपूर्वी एका अभ्यासू काँग्रेस नेत्याने हेच भविष्य वर्तवले नव्हते का?

जयराम रमेश हे तेव्हा राहुलची भाषणे लिहून द्यायचे आणि ते अभ्यासू नेते आहेत. अलीकडे ते राहुलच्या जवळपासही कुठे दिसत नाहीत. इतरत्रही काँग्रेसच्या गर्दीत दिसत नाहीत. पण 2013 च्या मध्यास त्यांनी काही सत्ये कथन केलेली होती. नरेंद्र मोदी हे काँग्रेससमोरील स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठे आव्हान आहे, असे रमेश म्हणाले होते, तर त्यांना मोदीभक्त म्हणून हिणवण्याची स्पर्धा राहुलभक्तांमध्ये लागली होती. आता त्याचीच प्रचिती येत असतानाही हा आपल्यातलाच ज्योतिषी कोणा काँग्रेसवाल्यांना आठवू नये, ही शोकांतिका आहे. मग जेव्हा लोकसभा प्रचाराचे वेध लागले तेव्हा रमेश यांनी काँग्रेसच्या अभूतपूर्व पराभवाची सज्जता राहुल कशी करत आहेत, त्याचेही भाकीत केलेले होते. आम्ही काँग्रेसजन 2014 च्या लोकसभेची चिंता करीत आहोत आणि राहुल 2019च्या निवडणुकीसाठी काँग्रेस संघटना बांधत आहेत, अशी टिप्पणी रमेश यांनी केली होती. त्याचा अर्थ असा, की राहुलना 2014 मध्ये निवडणूक असल्याचा थांगपत्ता नाही. म्हणूनच त्या मतदानात काँग्रेसचा पुरता बोर्‍या राहुल वाजवतील, असेच रमेश यांना सुचवायचे होते. आज चेन्नईला करुणानिधी गोळा करण्यासाठी वाडगा घेऊन जमलेल्या अन्य पक्षांतल्या नेत्यांना तरी 2019 म्हणजे कधी व काय, याचा पत्ता लागला आहे काय? त्यातले उमर म्हणतात, 2019 विसरा आणि 2024 च्या तयारीला लागा. हे असेच चालू राहिले, तर 2024 सुद्धा सोपी गोष्ट उरणार नाही. सन 2024 मध्ये भाजप व मोदींची सत्ता टिकेल किंवा नाही, हे आज सांगता येणार नाही. पण जे दिवाळखोर चेन्नईत जमले होते, त्यातला कोणीही 2024 सालात निवडणुका लढण्याच्या स्थितीत नक्कीच नसतील. कारण त्यांना स्थळकाळाचेही भान उरलेले नाही. त्यांना वास्तवाची जाणीव राहिलेली नाही. त्यापैकी कोणालाही आजच्या भारतीय जनतेची मानसिकताही समजण्याचे आकलन उरलेले नाही.