मुंबई । बीसीसीआयचे लाडके अपत्य असलेल्या इंडियन प्रिमीअर लीगच्या पहिल्या सत्रातील विजेते राजस्थान रॉयल्स आणि दोन वेळा ही स्पर्धा जिंकणार्या चेन्नई सुपर किंग्ज या फ्रॅचायझींवर घालण्यात आलेल्या दोन वर्षांचा बंदीचा कालावधी आता संपला आहे. त्यामुळे आगामी, 2018 मधील आयपीएलच्या 11 व्या सत्रातील सामन्यांसाठी हे दोन्ही संघ उपलब्ध असतील. आयपीएलच्या 2013 मधील सत्रात सामने फिक्सिंग प्रकरणात दोषी ठरल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघावर 2015 मध्ये दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर या दोन संघाच्या जागेवर गुजरात लायंस आणि रायझींग पुणे सुपरजायंट्स या अन्य दोन संघाना स्थान देण्यात आले होते. या दोन्ही नवीन फ्रँचायझींनी 2016 आणि 2017 मध्ये झालेल्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघावरील बंदी संपल्यामुळे आयपीएलमधील फ्रॅचायझींची संख्या 10 झाली आहे. त्यामुळे 2018 मधील आयपीएलचे सामने किती संघामध्ये खेळवायचे याचा निर्णय आयपीएलची संचलन समिती आणि बीसीसीआयला घ्यावी लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी गुजरात लायंस आणि पुणे सुपरजायंट्स संघाची आयपीलमधील वाटचाल थांबण्याची शक्यता आहे. या दोन्ही संघातील खेळाडू आपापल्या मुळ संघाकडे परत जातील. आयपीएलमध्ये 10 संघ खेळले तर स्पर्धेतील सामन्यांची संख्या आणि कालावधी खूपच वाढणार असल्याने सगळेच वेळापत्रक कोलमडू शकते. त्यामुळे बीसीसीआय ही लीग 10 ऐवजी आठ संघामध्येच खेळवणे पसंत करेल.
सोशल मीडियावर चेन्नईचा ट्रेंड
बंदीचा कालावधी संपताच सोशल मीडियावर सीएसके रिटर्न्सचा ट्रेंड गाजतो आहे. चेनन्ई सुपरकिंग्जच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक मोहिम राबवली जात असून संघाचे चाहते त्यात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. सोशल मीडियावर चेन्नई सुपरकिंग्जशी निगडित चांगल्या आठवणी शेअर केल्या जात आहेत. काही चाहत्यानी खेळाडूंसोबत काढलेले फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
चेन्नईसाठी धोनी महत्त्वाचा
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी चेन्नईसाठी खूपच महत्वाचा खेळाडू आहे. चेन्नई सुपरकिंग्ज क्रिकेट लिमीटेडचे एक संचालक के. जॉर्ज. जॉन म्हणाले की, संघावरील बंदी संपली आहे. बंदीमुळे चेन्नई सुपरकिंग्जच्या ब्रँडवर काहीही परिणाम झालेला नाही. एखादा खेळाडू कायम ठेवण्याची संधी मिळाल्यास निश्चितच धोनीला संघात कायम ठेवू. धोनीचा पुणे संघाशी असणारा करार यावर्षी संपणार आहे. सध्यातरी धोनीशी संपर्क साधलेला नाही. संघाची रणनिती तयार झाल्यावर धोनीशी चर्चा करु.मात्र, चाहात्यांनी धोनीला लगेचच कर्णधार केले आहे.