भुसावळ : धोका अथवा दुर्घटना झाल्यास रेल्वेने प्रवासी गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंगचा (एसीपी) पर्याय उपलब्ध करून दिला आहे मात्र काही प्रवासी अलार्म चेन पुलिंगचा वापर स्थानकात उशिरा पोहोचणे, मधल्या स्थानकांवर उतरणे-चढणे आदी क्षुल्लक कारणांसाठी करतात. यामुळे गाड्यांना विलंब होते. या पद्धतीने विनाकारण एसीपी करणार्या 108 प्रवाशांकडून रेल्वेने 1 ते 20 एप्रिल दरम्यान 47 हजार 200 रूपयांचा दंड वसूल केला.
विनाकारण एसीपीमुळे गाड्यांचा खोळंबा
विनाकारण एसीपी केल्याने गाडीचा खोळंबा होतो शिवाय त्या गाडीमागे धावणार्या इतर रेल्वे गाड्यांच्या दळणवळणावर सुध्दा परिणाम होतो. अशा अवास्तव अलार्म चेन पुलिंगच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या पाचही विभागात बारीक लक्ष ठेवणे सुरू आहे. त्यानुसार 1 ते 20 एप्रिल या केवळ 20 दिवसांत चैन पुलिंगची 157 प्रकरणे रेल्वेकडे नोंदवली गेली. यापैकी 108 प्रवाशांकडून 47 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोणत्याही प्रवाशाने नियम मोडल्यास कारवाईचा इशारा रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला.