चैन चोरीच्या प्रयत्नात धुळ्यातील चोरटे जाळ्यात

0

जळगाव: – महिलेच्या गळ्यातील चैन लांबवण्याच्या प्रयत्नात धुळ्यातील तिघा चोरट्यांचा मुसक्या चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण ग्रामस्थांनी आवळल्या. आरोपींविरुद्ध मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तक्रारदार जयराम सोनीराम निकम (चिंचगव्हाण) यांच्या भाची तथा आशाबाई राजेंद्र पाटील यांच्या गळ्यातील चैन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी लांबवून पळ काढला तर महिलेने आरडा-ओरड केल्यानंतर ग्रामस्थांनी आरोपींचा पाठलाग करून त्यांना चोप देत मेहुणबारे पोलिसांच्या स्वाधीन केले.

धुळ्यातील आरोपी जाळ्यात
चैन चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी धुळे येथील पवन हिरामण मोरे (19), आकाश दगडू पवार (19) व जयेश कैलास मोरे (19) यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या अटकेनंतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तपास चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीखक दिलीप शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेख नाजीर करीत आहेत.