चोचिंदे वनीकोंड ग्रामस्थांनी दिले अजगराला जीवदान

0

महाड : ग्रामीण भागात साप दिसला की, त्याला जागीच मारून टाकले जात असते. परंतु, महाड तालुक्यातील चोचिंदे वनीकोंड येथील ग्रामस्थांनी अजगराला जीवदान दिले आहे. यामुळे ग्रामीण भागातही आता सरपटणारा प्राणी व पशुपक्षांबाबत जनजागृती झाली असल्याचे चित्र दिसत आहे.

चोचिंदे वनीकोंड येथील शशिकांत बटावले यांच्या जनावरांच्या गोठ्यात अजगर आहे याची चाहूल लागली. येथील गणेश भुवड या तरुणाने सिस्केप या प्राणिमित्र संस्थेकडे याची खबर दिली. गावातील सारे लहान मोठे ग्रामस्थांनी गर्दी केली होती. सर्पमित्र येईपर्यंत कोणीही अजगरावर प्रहार न करण्याचा निर्णय घेतला होता. संस्थेचे प्रेमसागर मेस्त्री, पंकज चौधरी आदींनी त्वरित चोचिंदे वनीकोंड येथे धाव घेतली. तेथे त्यांना महाकाय अजगराचे दर्शन झाले, त्याला पकडण्यासाठी मात्र गोठ्यातील खूप अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्याला व्यवस्थित पकडण्यासाठी सिस्केप संस्थेचे प्रेमसागर मेस्त्री, सौरभ शेठ, पंकज चौधरी व गावातील समीर बटावले, संदेश वनगुले, नंदू वनगुले व वनखात्याचे वनरक्षक पी. डी. जाधव व ए. ए. सकपाळ यांनी मदत केली. चोचिंदे वनीकोंड गावाने दाखवलेल्या या सर्पप्रेमाबद्दल वनखाते आणि सिस्केप संस्था यांनी गावाचे आभार मानले.