चोपडा अर्बनच्या व्यवस्थापकांसह चौघांना पोलीस कोठडी

0

माजी मंत्री खडसे फसवणूक प्रकरण ; मुक्ताईनगर पोलिसांकडून गुन्ह्याची कसून चौकशी

मुक्ताईनगर- माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना अडकावण्यासाठी खोटे दस्तावेज तयार करून उच्च न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह सहा जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात बुधवार, 13 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुक्ताईनगर पोलिसांकडून या गुन्ह्याचा खोलवर तपास सुरू असतानाच चोपडा अर्बन बँकेतून धनादेश गहाळ वा चोरी झाल्यानंतर त्या संदर्भात गुन्हा दाखल न करणार्‍या व कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्‍या तत्कालीन बँक व्यवस्थापकासह चौघांना गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली होती. आरोपींना शुक्रवारी मुक्ताईनगर न्यायालयात हजर केले असता त्यांना 28 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

चौघा आरोपींना अटक
चोपडा अर्बनचे तत्कालीन व्यवस्थापक अविनाश भालचंद्र पाटील (45), वसुली अधिकारी योगेश काशीनाथ बर्‍हाटे ( 40) व किशोर लक्ष्मण अत्तरदे (47, तिघे रा.चोपडा) यांना गुरुवारी सकाळी तर सायंकाळी वसुली कर्मचारी शरद वानखेडे यांना मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली होती. संशयीतांना शुक्रवारी मुक्ताईनगर न्यायालयात हजर केल्यानंतर निरीक्षक अशोक कडलग यांनी संशयीताचा गुन्ह्यातील सहभागाबाबत सखोल चौकशी करावयाची असल्याने पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने संशयीतांना 28 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.