चोपडा-चुंचाळे रस्त्यावर 65 हजारांचा ऐवज लुटला

0

चोपडा। चोपडा-चुंचाळे रस्त्यावर रस्त्यावर निंबाचे झाड आडवे टाकून, शस्त्रांचा धाक दाखवत दरोडेखोरांनी सोने चांदीचे दागिने व रोख रकमेसह 65 हजारांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांच्या मारहाणीत दोघ वाहनचालक किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. पोलीस सूत्रांच्या माहिती नुसार चुंचाळे येथील 22 महिला ऋषीपंचमीनिमित्त शेगावला जात होत्या. 25 रोजी रात्री सव्वा अकरा ते पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान चोपडा-चुंचाळे रस्त्यावर नवल नदीजवळ दरोडेखोरांनी निंबाचे झाड तोडून रस्त्यावर आडवे टाकले व वाहनांवर दगडफेक करून ती अडविली. या दरोडेखोरांमध्ये एक 50 ते 60 वयोगटातील वयस्कर इसम व 25 ते 35 वयोगटातील 10 ते 12 तरुणांचा समावेश होता. त्याच्या हातात कुर्‍हाड, विळा व लाकडी दांडा होता. त्यांनी लाकडी दांडयाने गाडीच्या काचा फोडल्या. शस्त्रांचा धाक दाखवून वाहनात बसलेल्या महिलांकडून सोने चांदीचे दागिने, दोन मोबाईल असा 65 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

दोघा चालकांना केली मारहाण
दरोडेखोरांनी दोघ चालकांना हातावर, डोक्यावर मारहाण करून दुखापत करीत पळ काढला. याप्रकरणी चालक गुरुदास भगवान पाटील (वय 42 रा. चुंचाळे, ता. चोपडा) यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव चाळीसगाव, उपविभागीय पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुळक, सुजीत ठाकरे, दरोडा प्रतिबंधक पथक जळगाव घटना स्थळी भेट देत संपूर्ण परिसर पिंजून काढला. तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे करीत आहेत.