चोपडा तालुक्यात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले

एक पायलट ठार दुसरी पायलट जखमी

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील वर्डीपासून जवळच असलेल्या रानतलाव परिसरात आज दुपारी प्रशिक्षणार्थी विमानाला झालेल्या अपघातात एक पुरूष पायलट ठार झाला असून महिला पायलट जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत वृत्त असे की, वर्डी गावापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असणार्‍या रानतलाव या परिसरात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. येथून जवळच शेतात काम करणार्‍यांना मोठा आवाज ऐकल्याने याची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता पुरूष पायलट नुरल अमीन (वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पायलट अंशिका गुर्जर (वय २१) ही महिला पायलट जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
तहसीलदारांची धाव
प्रशिक्षणार्थी विमानाच्या अपघाताची माहिती समोर येताच तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, शेतात काम करणार्‍यांना पहिल्यांदा नेमके काय झाले हे कळलेच नाही. मात्र त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता विमानाचा अक्षरश: चुराडा झाल्याचे दिसून आले. यातील वैमानिक हा जागीच ठार झाला होता, तर महिलेला जबर दुखापत झाली होती. तेथे स्ट्रेचरची व्यवस्था नसल्यामुळे झोळी करून या जखमी महिला पायलटला खाली नेण्यात आले.
विमान शिरपूर एव्हीएशन सेंटरचे
अपघातग्रस्त झालेले विमान हे शिरपूर एव्हीएशन सेंटरचे असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात शिरपूर तहसीलदारांना कळविण्यात आले आहे.