चोपडा : येथील नगरपरिषद उपाध्यक्षपदासाठी प्रशासनाच्यावतीने निवडणूक प्रक्रीया राबविण्यात आली. यापदासाठी एकूण 4 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यात हितेंद्र रमेश देशमुख उर्फ राजू देशमुख यांचे 3 तर महेंद्र एकनाथ धनगर यांचा 1 अर्जाचा समावेश होता. मात्र सेनेचे उमेदवार महेंद्र धनगर यांनी माघार घेतल्याने उपाध्यक्षपदासाठी चोपडा विकास मंचाचे नगरसेवक हितेंद्र (राजू) रमेश देशमुख यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी यांनी घोषित केले. हितेंद्र देशमुख यांच्या अर्जासाठी शोभाबाई देशमुख, गजेंद्र जाधसवाल, अशोक बाविस्कर हे सूचक तर सुप्रिया सनेर, सुरेखा माळी, नारायण बोरोले अनुमोदक होते. नामनिर्देशित नगरसेवकांच्या निवडीसाठी शिवसेनाकडून प्रकाश मोहन पाटील, तर चोपडा विकास मंचाकडून अश्विनी प्रसन्न गुजराथी, व घनश्याम अग्रवाल यांची निवड झाली असल्याचे पिठासीन अधिकारी मनिषा चौधरी यांनी प्राप्त अधिकारानुसार जाहीर केले. स्वीकृत नगरसेवकपदासाठी 16 रोजी विहीत नमुन्यात जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे वरील उमेदवारांनी अर्जाचे प्रस्ताव सादर केले होते. या निवडीनंतर उपाध्यक्ष राजू (हितेंद्र) देशमुख यांचे फटाक्यांची आतिषभाजीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्वीकृत सदस्यांची माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. निवडणूक प्रक्रीयेसाठी प्रभारी मुख्याधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी मोलाचे सहकार्य केले. न.प.उपाध्यक्ष पदासाठी मौखीक करारानुसार 6 महिने कालावी असून स्वीकृत नगरसेवक पदासाठी अडीच वर्षाचा कालावधी असल्याची जोरदार चर्चा यावेळी शहरात होती. शिवसेनेचे प्रकाश पाटील यांनी स्वीकृत म्हणून घेतल्याने सेनेने योग्य उमेदवारास न्यास दिल्याचे तर चोपडा विकास मंचाच्या माध्यमातून नंबर दोन वाल्यांना स्विकारल्याची चर्चा सर्वत्र ऐकण्यास मिळाली. चोपडा विकास मंचने राष्ट्रवादी एक तर भाजप एक समीकरण न.प.मध्ये स्विकारले असून भाजपाच्या स्वीकृत नगरसेवक घनश्याम अग्रवाल बाबत मात्र चर्चेला उधाण होते.