चोपडा । येथे श्री गोवर्धनदास भिकारीदास शेठ गुजराथी, मगनलाल नगीनदास शेठ यांनी पुढाकार घेऊन चोपडा गावात लोकांची सभा बोलावली व त्यावेळी त्या सभेत चोपडा येथे बँक स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार असि. रजिष्ट्रार को- ऑप सोसायटीज् जळगाव यांचेकडे 9 ऑगस्ट 1939 रोजी अर्ज केला दि. 25 ऑक्टोंबर 1939 रोजी चोपडा पिपल्स अर्बन को- ऑप क्रेडीट सोसायटीची स्थापना झाली व त्याप्रमाणे 14 ऑक्टोंबर 1940 रोजी क्रेडीट सोसायटीचे रुपांतर बँकेत झाले. स्थापनेच्या वेळेस फक्त 63 सभासद होते. आज अमृत महोत्सवा अखेर सभासदांची संख्या चार हजार गेली आहे. सुरुवातीला बँक एक लहानशा जागेत होती. सन 1976 साली याच बँकेने श्रीमंत प्रतापशेटजी यांची इमारत विकत घेतली बँक स्वत:च्या वास्तुत प्रवेश करती झाली ही देखील इमारत अपुरी पडू लागली. त्यामुळे 1 मार्च 1987 रोजी सुसज्य अशी इमारत बांधली त्या इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्याहस्ते झाले.
बॅक ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम
ग्रामीण भागातील लोकांना, व्यापारी व गावातील नोकरदारांना बँकींग व्यवहार करण्याच्या दृष्टीने या बँकेने 24 सप्टेंबर 1988 मध्ये सकाळ- संध्याकाळ बाजारपेठ शाखा सुरु केली. 1939 साली बँकेत फक्त दोनच सेवक होते. आज जवळजवळ 40 लोकांचा स्टाफ आहे. बँकेच्या दैनंदिन व्यवहार वाढत गेल्याने सन 1992 साली बस स्टँड रोड शाखा सुरु केली. आज पावेतो संस्थेने रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हिरक महोत्सव व आता अमृत महोत्सव साजरा करित आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून बँकेने ट्रस्टच्या माध्यमातून विविध सुविधा सुरु केल्या हृदयरोग निदान शिबीर, कान, नाक, घसा शिबीर, नेत्र चिकित्सा शिबीर, पर्यावरण संतुलनसाठी 2016 मध्ये अरूणभाई गुजराथी यांचे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला. 2006 साली चोपडा गावात महापूर आला. त्यावेळी बँकेकडून पीडीतांना पूरग्रस्तांना जेवणाची, राहण्याची, कपड्याची व्यवस्था केली. बँक दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेत इ. 10 वी व 12 वीत प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करित असते. दरवर्षी तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट सर्च इंग्रजी परीक्षेचे आयोजन करीत असते. रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हिरक महोत्सव या वर्षात सभासदांना भेटवस्तु दिली आहे. आज अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक सभासदास चांदीची वाटी भेट वस्तु स्वरूपात देत आहे.
1992 पासून निवडणूक होते बिनविरोध
गेल्या पाच वर्षापासून पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होत आहे. त्या दृष्टीकोनातुन बँकेने नागलवाडी, वर्हाड रस्त्यावर पाण्याची पातळी वाढविण्यासाठी बंधारा तयार केला आजपर्यंत त्याची देखरेख बँक करीत आहे. चोपडा गावात बसस्टँड येथे बाहेरगावाहून येणारे जाणार्यांसाठी पाणपोई सुरु केली. सभासदांसाठी एक लाख रूपयांचा विमा दरवर्षी बँक घेत असते. 1992 साली चंद्रहासभाई गुजराथी यांनी बँकेची चेअरमन म्हणून धुरा सांभाळली. विशेष म्हणजे 1992 पासून या संस्थेत निवडणूक झालेली नाही. प्रत्येक निवडणूक बिनविरोध झाली आहे. आज सुद्धा विद्यमान चेअरमन म्हणून चंद्रहासभाई गुजराथी आहेत. कुशल नेतृत्व, धडाडीचे निर्णय, महत्वाकांक्षा या सर्व गोष्टीची सांगड चंद्रहासभाई यांनी घातली. त्यामुळे बँकेच्या आज अखेर एकूण ठेवी 77 कोटींच्या झाल्या आहेत. बँकेच्या सर्व प्रगतीत आजी, माजी सेवकांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. बँकेने रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाप्रमाणे अद्यावत कोअर बॅकींग प्रणाली, एन.ई. एफ.टी., आर.टी.जी.एस. सुविधा, एस.एम.एस. सुविधा सुरु केली आहे. लवकरच पुढील महिन्यात रूपे कार्ड, एटीएम सुविधा उपलब्ध होणार आहे. बँकेच्या सर्वांगिण विकासात अरूणभाई गुजराथी यांचे फार मोठे योगदान आहे. आज बँकेबरोबर भाईंचा सुद्धा अमृत महोत्सव साजरा होत आहे हा दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल.