चोपडा शहरात 70 हजारांचा गांजा जप्त : तिघांना अटक

चोपडा : गांजा विक्री व खरेदीच्या प्रयत्नात असलेल्या तिघांच्या बसस्थानक भागातून चोपडा पोलिसांनी मुसक्या आवळत गुन्हा दाखल केला आहे. संशयीतांकडील 13 किलो गांजा जप्त करण्यात आला. गांजा विक्री करणार्‍या विक्की विनोद झवर (22, रा.गुजरवाडा, भोकर, ता.जि.जळगाव) सह गांजाची खरेदी करणार्‍या मनवेल माटीन म्हस्के (33, रा.संजय गांधी नगर, ओ.टी.सेक्शन, रेल्वे स्टेशनजवळ उल्हासनगर, ठाणे) व जितेंद्र रवींद्र महाजन (30, रा.515/1029 सानेगुरुजी नगर, स्टेशन रोड, उल्हासनगर 4, ठाणे) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत. गुरुवारी न्यायालयाने संशयीतांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा शहर पोलिस स्टेशनमधील गुप्तवार्ता शाखेचे कर्मचारी विलेश सोनवणे यांना गांजा विक्री व खरेदीचा व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर बसस्थानक भागात सापळा रचून कारवाई करण्यात आली. संशयीत विक्की विनोद झंवरकडील 13 किलो वजनाचा गांजा घेताना मनवेल व जितेंद्र यांना पकडण्यात आले. बुधवार, 23 फेब्रुवारी रोजी रात्री 10.50 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.