भुसावळसह जळगाव व मलकापूरातील बुकी रडारवर ; कारवाईची शक्यता
भुसावळ- आयपीएल बुकी प्रकरणात चोपड्याचे भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी घनश्याम अग्रवाल यांना रायगडातील खालापूर पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 9 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आता सहा प्रमुख बुकींसह अटकेतील आरोपींची संख्या आता आठ झाली आहे. दरम्यान, आयपीएलचे धागेदोर भुसावळसह जळगाव व मलकापूरापर्यंत पोहोचले असून या बुकींवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे या गावांमध्ये आयपीएलचा धंदा जोमात असताना स्थानिक पोलीस प्रशासनासह स्थानिक गुन्हे शाखा याबाबत अनभिज्ञ कशी? असा सवालही आता उपस्थित होत आहे.
आठ बुकींना पोलीस कोठडी
रायगड गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकत चौक गावातील लिलाई हॉटेलमधून विक्रम वारसमल जैन (39, निगडी, पुणे), नरेश रामस्वरूप अग्रवाल (47, सामाटणे, तळेगाव), नवीन बाळकृष्ण अग्रवाल (41, देहु रोड, पुणे), दीपक दौलतराम कृपलानी (43, जाधववाडी, पुणे), नदीम मैमुद्दीन पठाण (28, आकुर्डी, पुणे) व लॉजमालक रवींद्र राजाराम डोंगरे अटक केली होती. आरोपींच्या ताब्यातून 98 हजारांची रोकडसह कार, मोबाईल, कॅलक्यूलेटर, सेट टॉप बॉक्स, पोर्टेबल टीव्ही, फोन आदी साहित्य मिळून 12 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. बुधवारी रात्री दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये सुरू असलेल्या सामन्यादरम्यान रात्री उशिरा कारवाई झाली होती. अटकेतील आरोपींना न्यायालयाने 9 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अटकेतील बुकींनी पुण्यातील बुकी विजय अग्रवालचे नाव सांगितल्यानंतर त्यास अटक करण्यात आली व या आरोपीने चोपड्यातील घनश्याम अग्रवाल या बड्या बुकीचे नाव सांगितल्याने त्यांना शनिवारी अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात आयपीएल जोमात ; पोलीस प्रशासन अनभिज्ञ कसे ?
आयपीएलच्या चोपडा कनेक्शननंतर जिल्ह्यातील आयपीएल बुकी रडारवर आले आहेत. त्यातच भुसावळसह जळगाव व मलकापूरातील बुकी चोपड्याशी कनेक्ट असल्याची माहिती असून या बुकींवरही लवकरच कारवाईचे संकेत आहेत. अटकेतील घनशाम अग्रवाल पोलीस कोठडीत कोण-कोणत्या जिल्ह्यातील बुकींची नावे जाहीर करतात? याकडे लक्ष लागले आहे. राजाश्रय लाभलेल्या बुकींवर कारवाई होत नसल्याने सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त होत आहे.