बारीवाडातील रहीवाशांमधुन प्रशासनाविरूध्द संताप
चोपडा (प्रतिनिधी)- शहरात पाणी टंचाई निर्माण झाली असून आता पाणी चांगलेच तापू लागले आहे.शहरातील बारीवाडा,मातंग वाडा,बारगणअळी भागातील महिला व पुरुषांनी दि.२९ रोजी सकाळी ११ वाजे दरम्यान मोठया संख्येने सहभागी होत नगरपरिषदचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्या कॅबिनवर धडक दिली. गेल्या १५ ते २० दिवसापासून आमच्याकडे नगरपरिषदचा पाणी पुरवठा का करण्यात आला नाही? याचा जाब विचारण्यात आला. तसेच ज्या भागात पाणी सोडण्यात आले होते, त्याच भागात पुन्हा पाणी पुरवठा होत असल्याचे देखील संतप्त नागरिकांनी यावेळी मुख्याधिकारी यांना सांगितले.
चोपडा शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आज नागरीकांच्या सहनशक्तीचा अंत झाल्याने नागरीकांनी घोषणाबाजी करीत नगरपालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्या दालनात धडक दिली. यावेळी महिलांनी सांगितले की, ज्या भागात राजकिय पुढारी वास्तव्यास आहेत त्या ठिकाणी डबल पाणी पुरवठा होत असतो. पुढारी मंडळी कदापी टँकर वरून पाणी भरतांना दिसत नाहीत. बारीवाडा भागातील पाण्याची समस्या नित्याची झाली असून अनेक वेळा तक्रारी करून देखील दखल घेतली जात नाही. नगरपालिकेत आम्ही आलो असता आमच्या समस्या दूर करण्यासाठी एकही नगरसेवक तथा लोकनियुक्त नगराध्यक्षा हे उपस्थित नव्हते, असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
मुख्याधिकार्यांकडुन उडवाउडवीची उत्तरे
स्थानिक रहिवाश्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी समस्या ऐकून न घेता उडवा उडवीची उत्तरे दिली.निवेदनावर ज्योती बारी,संगिता जोशी,रंजना महाजन, विमल मराठे,उशाबाई नेटके,सुनंदा पाटील,हसीना शब्बीर, वैशाली बारी,राजू मिस्तरी, प्रकाश बारी,सुरेश बारी,विमल बारी,आदींसह मोठ्या संख्येने रहिवाशींच्या सह्या आहेत. यावेळी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दाखविली.