चोपड्यात मराठी साहित्य परीषद शाखेची स्थापना

0

चोपडा। समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेल्या चोपडा तालुक्याच्या सांस्कृतिक-साहित्यिक वातावरणाला अधिक गतिमान करण्यासाठी व रसिकांना मराठी भाषेतील साहित्यिक घडामोडींना अधिक जवळून अनुभवता यावे, या हेतुने चोपड्यात मराठी साहित्य परिषदेची शाखा स्थापन करण्यासाठी चोपड्यातील साहित्य रसिकांची प्रारंभिक बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. शहरातील जेष्ठ साहित्यिक-कवी, निवृत्त मुख्याध्यापक अशोक सोनवणे यांच्या निवासस्थानी त्यांच्याच अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मराठी साहित्य परीषद, पुणे या संस्थेशी संलग्न असणार्‍या या शाखा स्थापनेच्या बैठकीचे प्रास्ताविक येथील विलास पाटील-खेडीभोकरीकर यांनी विशद करत मसापच्या शाखेची आवश्यकता मांडली.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
कवी अशोक सोनवणे यांनी परिषदेची कार्यपद्धती, सभासद नोंदणी, राबविण्यात येणारे उपक्रम, भविष्यातील संधी, याविषयी मार्गदर्शन केले. पत्रकार संजय बारी यांनी भविष्यातील उपक्रमांसाठी सहकार्याचे आवाहन करत उपस्थितांचे आभार मानले. यावेळी चंदूलाल पालिवाल, माजी नगराध्यक्षा डॉ जया पाटील, माजी मुख्याध्यापिका जयश्री पाटील-चव्हाण, कवयित्री योगिता पाटील, कवी बाळकृष्ण सोनवणे, माजी मुख्याध्यापक टी.एम. चौधरी, प्राचार्य राजेंद्र महाजन, कवी रमेश पाटील, शिक्षक योगेश चौधरी, पंकज नागपुरे, तुषार लोहार, हितेंद्र मोरे, पवन लाठी, किमया प्रकाशनचे आर.डी.पाटील, सागर तायडे, प्रा. प्रदीप पाटील, शांताराम पाटील, विनोद कुलकर्णी यांच्यासह अनेक साहित्य रसिक उपस्थित होते.