चोपड्यात सहा वर्षाच्या चिमुकलीवर धारदार वस्तूने हल्ला

चोपडा : सहा वर्षाच्या मुलीवर धारदार वस्तूने शेजारी राहणार्‍या चार वर्षीय बालिकेने वार केल्याची घटना चोपडा शिवारातील शिरपूर बायपास रोडवर मंगळवारी दुपारी घडली. यात चिमुकली गंभीररीत्या जखमी झाली तिच्यावर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. याबाबत चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हल्ल्याचे कारण अस्पष्ट
चोपडा शिवारातील शिरपूर बायपासजवळ जानुबाई भाईदास बारेला (32) ह्या महिला पती आणि चार मुलांसह वास्तव्याला आहे. मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवार, 8 फेब्रुवारी रोजी जानुबाई बारेला ह्या कामानिमित्त शेतात गेल्या होत्या तर त्यांचे पती भाईदास काना बारेला हे मध्यप्रदेशात कामानिमित्त गेले होते. त्यावेळी चिमुकली रीतू उर्फ रीता ही घरी एकटी होती. त्यांच्या घराच्या शेजारी किरण बारेला आणि त्याची चार वर्षीय अल्पवयीन बहिण हे देखील राहतात. दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरापासून काही अंतरावर असलेल्या हॉटेल सुनीताजवळ किरणच्या चार वर्षीय अल्पवयीन बहिणीने सहा वर्षाच्या चिमुकलीवर धारदार वस्तूने तोंडावर, हातावर, पायाच्या मांडीवर आणि डोक्याच्या मागच्या भागावर वार केले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. दरम्यान ‘मुलीला का मारले ?’ याची माहिती मिळू शकली नाही. मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने चोपडा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले तर पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रात्री आठ वाजता दाखल करण्यात आले. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित साळवे करीत आहे.