चोपड्यासह पाचोरा, मुक्ताईनगरसाठी मतदान यंत्र रवाना

0

भुसावळ- जळगावसह रावेर लोकसभेसाठी 23 रोजी निवडणूक होत असून त्या दृष्टीने प्रशासन सज्ज झाले आहे. भुसावळ तहसील कार्यालयाच्या शासकीय गोदामात व्हीव्हीपॅट, बॅलेट व कंट्रोल युनिट पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आले असून शुक्रवारी चोपड्यासह पाचोरा, मुक्ताईनगरसाठी मतदान यंत्र रवाना करण्यात आले. त्यात पाचोर्‍यासाठी 387, मुक्ताईनगर 382 चोपडा 382 या विधानसभा मतदार क्षेत्रासाठी एक हजार 151 मतदान यंत्रे रवाना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधिकार्‍यांचे पथक नियुक्त
भुसावळ महसूल प्रशासनाकडे सात हजार 842 बॅलेट युनिट, चार हजार 408 कंट्रोल युनिट तसेच चार हजार 752 व्हीव्हीपॅट यंत्र प्राप्त झाले आहेत. हे सर्व यंत्र मतदार संघनिहाय वाटप केले जात आहे. या कामासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून अधिकारी व कर्मचार्‍यांचे स्वतंत्र पथक नियुक्त आहे. दरम्यान, जिल्हा निवडणूक विभागाकडून नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक प्रवीण पुरी यांनी संवेदनशील व अन्य मतदान केंद्रांची पाहणीदेखील केली.