चोरगेची कसून चौकशी!

0

जळगाव येथून अटक, पुण्यात आणले

पुणे : पुण्यातील प्रथितयश बिल्डर देवेंद्र शहा यांच्या हत्याकांडातील प्रमुख मारेकरी रवींद्र चोरगे याच्या अखेर पुण्याच्या गुन्हे शाखेने जळगावात मुसक्या आवळल्या असून, त्याला सोमवारी सकाळी पुण्यात आणण्यात आले. त्याचा दुसरा साथीदार राहुल शिवतारे हा अद्याप फरार आहे. चोरगे याची दिवसभर पोलिसांनी कसून चौकशी केली. चोरगे हा अट्टल गुन्हेगार असल्याने त्याने अद्याप तोंड उघडले नाही, तसेच शिवतारे कुठे आहे, याचीही माहिती दिली नाही, असे तपास अधिकारी म्हणाले.

पोलिस पोहोचण्यापूर्वी शिवतारे पळाला!
गत शनिवारी (दि.13) बिल्डर देवेंद्र शहा यांची रवींद्र सदाशिव चोरगे (वय 41, रा. सिंहगड रस्ता) व राहुल शिवतारे या इस्टेट एजंटांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर हे दोघे फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पुणे गुन्हे शाखा व डेक्कन पोलिसांची सहा पथके रवाना करण्यात आली होती. एका पथकाने चोरगे याच्या जळगाव येथे मुसक्या आवळल्या. चोरगे आणि शिवतारे मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर तर कधी जळगाव या भागात फिरत असल्याची माहिती डेक्कन पोलिसांना खबर्‍यांमार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चोरगे याला ताब्यात घेतले, तथापि, शिवतारे सापडू शकला नाही. पोलिस पोहोचण्यापूर्वीच शिवतारे पळाला, असे तपास अधिकार्‍यांनी सांगितले असून, त्याच्या मागावर पोलिस असून, लवकरच तोही जेरबंद केला जाईल, असेही सांगण्यात आले. चोरगेला ताब्यात घेताना पोलिसांनी प्रचंड गुप्तता पाळली. पथकातील सर्वांचे फोन स्वीचऑफ होते. हे पथक रविवारी रात्री उशिरा पुण्यात आल्यानंतरच त्यांचे फोन सुरु करण्यात आले. दरम्यान, चोरगे आणि शिवतारे हे दोघेही देवेंद्र शहा यांच्यासाठीच काम करत होते. कमिशनचे पैसे वेळेवर न दिल्यानेच हे हत्याकांड या दोघांनी घडविले, अशा निष्कर्षाप्रत पोलिस आले आहेत.

दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार
चोरगे व शिवतारे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, या दोघांविरोधात पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांत विविध गुन्हे दाखल आहेत. खडक पोलिसांनीही चोरगे याला एका प्रकरणात अटक केली होती. पूर्वी हे दोघेही नवीपेठेत राहात होते. पोलिसांनी या दोघांच्या कुटुंबीयांकडेही सखोल चौकशी केली. परंतु, कुटुंबीयांनी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. गेल्या आठ दिवसांपासून डेक्कन जीमखाना पोलिस व गुन्हे शाखेचे पथक या दोघांच्या मागावर होते. हे दोघेही मध्यप्रदेशात असल्याने स्थानिक पोलिसांचे सहाय्य घेणेही या पथकाने टाळले होते. अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे रवींद्र चोरगे याला अटक करण्यात आली असली तरी, शिवतारे मात्र अद्याप फरार असल्याने पोलिसांची काही पथके त्याच्या मागावर असल्याचेही पोलिसांनी सांगितले.