चोरटी दारू वाहतूक रोखण्यासह सीमा तपासणी नाक्यावर सतर्कता बाळगा

0

नाशिक परीक्षेत्राचे महानिरीक्षक डॉ.छेरींग दोरजे ; पालला बॉर्डर कॉन्फ्रन्स

रावेर- दारूची चोरटी वाहतूक रोखा, सीमावर्ती भागातून येणार्‍या गुन्हेगारांवर पकडण्यासाठी सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त वाढवा तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना नाशिक परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे यांनी दिल्या. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील पाल येथे वनविभागाच्या ‘अनुपम’ विश्रामगृहात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या हद्दीवरील दोन राज्याच्या पोलिस अधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीला मध्यप्रदेशचे महानिरीक्षक वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

खान्देशातील या अधिकार्‍यांची उपस्थिती
बॉर्डर मिटींगला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, धुळ्याचे पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, नंदुरबार अधीक्षक संजय पाटील, बर्‍हाणपूरचे अजय सिंग, खरगोनचे सुनील कुमार पांडे तसेच सीमावर्ती हद्दीतील सर्व वरीष्ठ अधिकारी, फैजपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह जिल्हाभरातील अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

गुन्हेगारांच्या माहितीचे देवाण-घेवाण
या बैठकीत येणार्‍या लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याबाबत चर्चा झाली. तसेच सीमावर्ती भागातून होणारी चोरटी दारूची वाहतूक थांबविण्यासह दोन्ही राज्यातील गुन्हेगारीबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण होवून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी घ्यावयाची दक्षता तसेच सीमा तपासणी नाक्यावर सतर्कता राखण्याच्या सूचना करण्यात आल्या. रावेर, यावल, चोपडा, फैजपूर, अडावद आदी पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षक उपस्थित होते.