उधळेनजीक महामार्गावर पाणी येणार
नदीपात्रातून चौपदरीकरण केल्याचा परिणाम
चाकण : कशेडी घाटाच्या पायथ्यापासून येणार्या चोरटी नदीचे पात्र महामार्गालगत विस्तारलेले आहे. या नदीपात्रालगतच महामार्ग जातो. नदीपात्र कुठून कुठपर्यंत जाते, पाण्याचा प्रवाह व लगत असलेल्या डोंगरमाथ्यावरून येणार्या पाण्याचा प्रवाह याचा विचार न करता नदीपात्रातूनच चौपदरीकरणाचे काम केल्यामुळे जास्त पाऊस पडल्यास उधळेनजीक महामार्गावर पाणी येणारच असल्याने काही काळ मार्ग ठप्प होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मातीचा मोठा भराव
बोरघरपासून भरणे रस्त्याचे काम करीत असताना कमी-अधिक उंच जागेवर भराव टाकून रस्त्याचे कॉक्रीटीकरण केले. चौपदरीकरण कामामुळे अनेक ठिकाणी महामार्गावर पाण्याचा निचरा होईल, अशी परिस्थिती नाही. अनेक ठिकाणी नदीलगत मातीचा मोठा भराव टाकल्यामुळे डोंगरमाथ्यावरून नदीपात्रात जाणार्या पाण्याचा मार्ग बंद झाला. यापुढे ही समस्या तीव्र होण्याची भीती, बोरघरचे माजी सरपंच उदयसिंग बोरकर यांनी व्यक्त केली.
ठेकदार, इंजिनिअर देईनात दाद
महामार्गांच्या चौपदरीकरणाचे कामामुळे ग्रामस्थांना तसेच वाहनचालकांना वेगवेगळ्या अडीअडचणींना तोंड लागते. संबंधित ठेकेदार बिनबोभाटपणे सार्या गोष्टींकडे कानाडोळा करीत आपली कातडी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. हे काम राष्ट्रीय बांधकाम विभागाचे आहे असा बाऊ करत, त्यामध्ये कुणीही अडथळा आणू नये यासाठी पोलिस, बांधकाम विभागाचा देखील या ठेकेदाराला भक्कम पाठिंबा आहे. विद्युत खांबालगतच खोदाई केली. सोसाट्याच्या वार्याबरोबर हे खांब पडण्याची शक्यता आहे. याकडे अनेकदा ग्रामस्थांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु इंजिनिअर कुणालाही दाद लागू देत नाहीत.
अवजड वाहने रुततात
महामार्गावर मातीच्या भरावामुळे अवजड वाहने मातीत रुततात. भोस्ते घाटात केलेल्या डोंगरकटाईमुळे अनेक ठिकाणी माती, वृक्ष खाली आले. रस्त्यावर चिखल येत असून, दुचाकी व चारचाकी गाड्या घसरण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. महामार्गावर मोठ -मोठे खड्डे पडले असून, वाहने हाकताना वाहनचालकांची दमछाक होते.