जळगाव। रिंग रोडवरील महेश प्रगती मंगलकार्यालयासमोर शुक्रवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास वाळुची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ट्रॅक्टरचालकाच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ट्रॅक्टर चालक अंधाराचा फायदा घेऊन फरार होण्यात यशस्वी झाला
ट्रॅक्टर सोडून चालक फरार
आव्हाणेकडून निमखेडी रस्त्यावरून शहरात दररोज वाळूची चोरटी वाहतूक होते. दररोज अनेक डंपर, ट्रॅक्टर या मार्गाने वाळूची चोरटी वाहतूक करतात. शुक्रवारी रात्रीही या मार्गाने एक ट्रॅक्टर येत असल्याची माहिती महसूल विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पिंप्राळा रेल्वे गेट पासून पथकाने या ट्रॅक्टरचा पाठलाग केला. ट्रॅक्टरचालकाच्या लक्षात आल्यावर महेश प्रगती मंगलकार्यालयाजवळ तो ट्रॅक्टर टाकून पसार झाला. या प्रकरणी तलाठी घन:श्याम दिगंबर लांबोळे (वय 37, रा. भिकमचंद जैननगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.