शहरात पोलिसांची गस्त ठरतेय तोकडी ; जुन्या चोर्यांचा तपास संथच ; गस्त वाढवण्याची गरज
भुसावळ:- शहरात जुन्या चोर्यांचा तपास संथ असताना चोरटे पुन्हा सक्रिय होवून चोर्या करीत असल्याने नागरीकांमध्ये भीती वाढली आहे. शहरातील यावल रोडवरील भीम मोबाईल शॉपी व त्याच्या बाजूला असलेली पान टपरी फोडण्याचा प्रयत्न गुरूवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास झाल्याने व्यापारीवर्गात घबराट पसरली आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
अल्पवयीन चोरट्यांकडून चोरीचा प्रयत्न
यावल रोडवरील दोन टपर्या फोडण्याचा प्रयत्न गुरूवारी पहाटे उघडकीस आला. अज्ञात चोरट्यांनी टपरीवर मोठा दगड मारून कडी कोयंडा तोडण्याचा प्रयत्न केला तसेच मोबाईल शॉपी व बाजूला असलेली पान टपरीत चोरी करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी उपद्रव केला. ही बाब सीसीटीव्हीत कैद झाली असून हा प्रकार भंगार वेचणार्या काही मुलांनी केल्याचे सांगण्यात आले. या प्रकारानंतर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले, उपनिरीक्षक गणेश कोळी, कमलाकर बागुल, संजय पाटील व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात काहीही नोंद झाली नसल्याचे सहायक निरीक्षक गंधाले यांनी सांगितले.