एरंडोल। शेतात उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या टायरची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना एरंडोल येथे घडली. याबाबत पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान शेतातून शेतीच्या अवजारांच्या चोरी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिकेचे माजी नगरसेवक संजय खंडू महाजन यांच्या मालकीचे ट्रॅक्टर ट्रॉली क्र. (एमएच19 एएन8018) त्यांच्या मालकीच्या उमरदे शिवारातील गट क्रमांक 24 मधील शेतात असलेल्या गोडावून समोर रात्री उभे करण्यात आले होते. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी संजय महाजन यांच्या ट्रॅक्टर चाच टूलबॉक्सचे कुलुप तोडुन त्यांच्याच जॅक लावून अज्ञात चोरट्यांनी सुमारे पंधरा हजार रुपये किमतीचे टायर डिक्ससह चोरून नेले.
संजय महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुधाकर लहारे तपास करीत आहेत. शहरात भुरट्या चोर्यांचे प्रमाण वाढले असून शहरासह परिसरात छोट्या मोठ्या चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. यात बंद घर बाहेरील वस्तु तसेच दर आठवड्याच्या बाजारात गर्दीचा फायदा घेत नागरिकांचे महागडे मोबाईल चोरीस जात आहेत.दरम्यान सदर चोरट्यांचा एरंडोल पोलिसांनी लवकरात लवकर बंदोबस्त करून नागरिकांना होत असलेला त्रास दूर करावा अशी मागणी होत आहे.