जळगाव । अजिंठा रस्त्यावरील हॉटेल अमरनाथ जवळून सोमवारी सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुचाकी लंपास केली होती. एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणी दोन संशयिताना अटक केली. त्यांना एक दिवसांनी पोलीस कोठडी सुनावली होती. गुरूवारी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपली असता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून दोघांची न्यायालयीन कोठडीत रवागनी करण्यात आली आहे.
पोलीस कोठडी संपताच न्यायालयात केले हजर
यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील राहूल बळीराम बाविस्कर (वय 31) हा सोमवारी कामानिमित्ताने शहरात आला होता. सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास अजिंठा रस्त्यावरील हॉटेल अमरनाथच्या बाजूला असलेल्या देशीदारू दुकानाच्या समोर त्याने त्याची दुचाकी (क्र. एम.एच. 19 एबी 0426) उभी करून कामासाठी निघून गेला. काही वेळानंतर तो परत आला असता जागेवर दुचाकी दिसून आली नाही. शोधाशोध केल्यानंतरही दुचाकी न मिळाल्याने राहूलने मंगळवारी एमआयडीसी पोलिसात दुचाकी चोरी झाल्याची तक्रार दिली. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी सुभाष मधुकर मराठे (वय 38), कैलास रमेश कोकाटे (वय 29, दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी) या दोघांना मंगळवारी अटक केली. त्यांना बुधवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. गुरूवारी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सुभाष मधुकर मराठे, कैलास रमेश कोकाटे या संशयितांना न्यायाधीश गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.