चोरट्यांची पोलिसांना नववर्षाची सलामी ; सुनंदिनी पार्कमध्ये 3 दिवसात चार घरफोड्या 

0

वणी गडावर गेलेल्या खत विक्री व्यावसायिकाच्या घरुन 5 लाखांचा एैवज लांबविला

जळगाव- नाशिक येथील वणी गडावर दर्शनासाठी गेलेल्या खत उत्पादन व विक्रीचा व्यवसाय असलेल्या दादाराव देविदास सोनवणे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी घर बांधकामासाठीचे तसेच सासूबाईंच्या सेवानिवृत्तीचे असे साडेचार लाख रुपये रोख व दागिने असा 5 लाख 2 हजार 300 रुपयांचा एैवज लांबविल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. दरम्यान या परिसरात तीन दिवसात चार घरफोड्या करून चोरट्यांनी पोलिसांना नवीन वर्षाची सलामी दिली आहे.

जुना खेडी रोड परिसरातील सदाशिवनगर येथील सुनंदिनी पार्क येथे दादाराव सोनवणे हे पत्नी, दोन मुली व सासू या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सोनवणे यांचा ऑर्गेनिक खते व द्रव मटेरीयल्स बनविणे व विक्रीचा व्यवसाय आहे.

रस्ता खराब, शिक्षणाकामी खोटेनगरात भाड्याने घर
मुली त्रुतूजा व समृध्दी ह्या दोन्ही पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत असून या कामी तसेच सदाशिवनगरातील रस्ते खराब असल्याने दादाराव सोनवणे यांना खोटेनगर येथील साई श्रध्दाविला मध्ये भाड्याने घर घेतले असून त्याठिकाणी ते पत्नी रुपाली यांच्यासह राहतात.

घर बांधकामाच्या व सासूच्या पैशांवर डल्ला
सदाशिवनगरातील घराला कुलूप लावून 2 जानेवारी रोजी नववर्षानिमित्ताने सोनवणे हे कुटुंबासह नाशिक येथे वणी गटावर दर्शनासाठी गेले. यादरम्यान चोरट्यांनी मेनगेट व घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी एैवज लांबविला. सोनवणे यांचे भुसावळ येथे शिरपूर कन्हाळा रस्त्यावर प्लॉट असून त्याठिकाणी घराचे बांधकाम करण्यासाठी दीड लाख रुपये तसेच सासू उर्मिला विवेक महाजन यांचे तीन लाख रुपये घरातील कपाटात होते. चोरट्यांनी या रोख साडेचार लाखांच्या रकमेसह 52 हजार 300 रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच सोन्याचे शिक्के असा एकूण 5 लाख 2 हजार 300 रुपयांचा एैवज लांबविला.

शेजार्‍यांनी माहिती दिल्यावर प्रकार उघड
3 जानेवारी रोजी दर्शनाहून परल्यावर थंडी असल्याने सोनवणे कुटुंबियांनी सदाशिवनगरात येणे टाळले. ते खोटेनगरातील घरी गेले. येथे सकाळी 9.30 वाजता सोनवणे यांना किरण शिवाजी भावसार यांनी फोनवरुन तुमच्या घराचे व मेनगेटचे कुलूप तुटलेले असल्याची माहिती दिली. त्यावरुन सोनवणे यांनी पत्नी रुपालीसह सदाशिवनगरातील घर गाठले. याठिकाणी दरवाजांची कुलूप कडी कोयंड्यासह तुटलेली तर घरात सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. चोरीची खात्री झाल्यावर दादाराव सोनवणे यांनी शनिपेठ पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली.

सुनंदिनी पार्क परिसरात तीन दिवसात 4 घरफोड्या
सुनंदिनी पार्क परिसरात 31 डिसेंबर ते 3 जानेवारी या तीन दिवसात चोरट्यांनी चार कुलूपबंद घरे फोडली आहेत. यात नाशिक येथे लग्नाला गेले जितेंद्र शिंपी कुटुंबिय यांच्याकडे चोरी झाली आहे. त्याचे गावातील बंधू प्रमोद शिंपी यांनी पाहणी केली आहे. शिंपी परतल्यावर नेमका एैवज किती गेला ते कळू शकणार आहे. तसेच याच परिसरात शालीग्राम रडे तयेच पंढरीनाथ चुडामण पाटील यांच्याकडेही घरफोडी झाल्याची माहिती मिळाली असून येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान गुरुवारी सोनवणे यांच्याकडील घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी श्‍वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.