शहरातील पंधरा बंगला भागातील तीन रेल्वे कर्मचार्यांचे घर फोडत लाखोंच्या ऐवजावर डल्ला ; वाढत्या घटनांनी नागरीकांमध्ये भीती
भुसावळ- पोलिस प्रशासनाच्या बेपवाईने शहरासह तालुक्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. धूम स्टाईल चेन-मंगळसूत्र चोरीनंतर आता थेट चाकू लावून मोबाईल चोरीच्या आठवडाभरात तब्बल चार घटना घडल्या असतानाच मुक्कामी असलेल्या चोरट्यांनी शहरास तालुक्यात मोठा धुमाकूळ घातला आहे. वांजोळ्यात 1 रोजी पहाटे तीन ठिकाणी घरफोड्यांची घटना ताजी असताना भुसावळातील पंधरा बंगला भागातही पुन्हा तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याने नागरीक धास्तावले आहेत. गुन्हेगारी थोपवण्याबाबत पोलिस प्रशासनाकडून कुठलीही ठोस कृती होत नसल्याने गुन्हेगारांची दिवसागणिक हिंमत वाढली आहे. शांतताप्रिय शहरासाठी ही बाब धोक्याची घंटा ठरू पाहत आहे. पोलिस प्रशासनाने आपले अस्तित्व दाखवून गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्यासोबतच चोरट्यांसह दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
पंधरा बंगला भागात एकाच रात्री तीन घरफोड्या
शहरातील पंधरा बंगला भागात शनिवारी रात्री 11 ते रविवारी मध्यरात्री दरम्यान चोरट्यांनी हैदोस घालत तीन रेल्वे कर्मचार्यांची घरे फोडली. एका घरातून लाखोंचा ऐवज लंपास झाला असून एक कर्मचारी गावावरून आल्यानंतर गेलेल्या मुद्देमालाचे वर्णन कळणार आहे तर एका घरातून चोरट्यांनी रीकाम्या हाताने परतावे लागल्याची माहिती आहे. रेल्वेच्या पीओएच विभागातील कर्मचारी नितीन मुकेश अमरोही हे गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांनी शौचालयाची खिडकी तोडून घरात प्रवेश केला. घराच्या कपाटातील सुमारे दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, लहान मुलांच्या गल्ल्यातील रोकड तसेच चांदीचे देवाचे दागिने व अन्य ऐवज मिळून सुमारे एक लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे सांगण्यात आले. चोरट्यांनी या नंतर रेल्वेतील पाणीपुरवठा कर्मचारी रामचंद्र यादव यांच्या घरातही याच पद्धत्तीने चोरीचा प्रयत्न केला मात्र घरात काहीही मौल्यवान ऐवज नसल्याने काहीही चोरीला गेले नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर चोरट्यांनी रेल्वेतील कर्मचारी असलेल्या मुकेश अंभोरे यांच्या घरात प्रवेश करून सामान सर्वत्र अस्ताव्यस्त फेकला मात्र अंभोरे हे गावाला गेल्याने नेमका काय ऐवज चोरीला गेला ? हे कळू शकले नाही. अंभोरे आल्यानंतरच चोरी गेलेल्या ऐवजाबाबत माहिती कळू शकणार आहे.
बाजारपेठ पोलिसांची धाव
रविवारी पहाटे पंधरा बंगला भागात चोर्या झाल्याची माहिती कळताच बाजारपेठचे पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्यासह बाजारपेठ पोलिस व डीबी कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित घर मालकांकडून चोरीबाबत माहिती जाणून घेतली तसेच परीसराची बारकाईने पाहणी केली.
लहान मुलाचा वापर झाल्याची शक्यता
चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडण्यासाठी शौचालयाची खिडकी तोडून घरात प्रवेश केला असून चोरीसाठी एखाद्या लहान मुलाचा समावेश झाला असावा, अशी शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या चोर्या-घरफोड्या पाहता बाहेरगावची टोळी शहरात सक्रिय झाल्याची चर्चा आहे. पोलिसांनी या दृष्टीने दखल घेवून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची अपेक्षा आहे.
शहर व बाजारपेठ हद्दीत मोबाईल लांबवले
भुसावळ- धूम स्टाईल मंगळसूत्र चोरीच्या घटनानंतर चोरट्यांनी आता पादचार्यांना लक्ष करीत त्यांच्याकडील महागडे मोबाईल लांबवण्याचा धडाका लावला आहे. शहर पोलिस ठाणे हद्दीत 30 मे रोजी लोणारी मंगल कार्यालयाजवळून प्रदीप चौधरी यांचा 14 हजार रुपये किंमतीचा मोबाईल तसेच तिकीट निरीक्षक प्रवीण मिश्रा यांचा लाल चर्चजवळून 23 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवण्याची घटना ताजी असतानाच एकाच 1 जून रोजी शहर व बाजारपेठ हद्दीतही अशाच पद्धत्तीने चोरी झाल्याने नागरीक धास्तावले आहेत. 1 रोजी दुपारी तीन वाजता लाल चर्चजवळून पायी जात असलेल्या फारूक अब्दुल अजीज कुरेशी (नालंदा नगर, भुसावळ) यांना 20 ते 25 वयोगटातील आरोपींनी चाकूचा धाक दाखवत एक हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावला तसेच दोन हजारांची रोकड लांबवत पोबारा केला. या गुन्ह्याचा तपास हवालदार साहिल तडवी करीत आहेत. दुसर्या घटनेत बाजारपेठ हद्दीतील संगीता सुभाष चिखलकर (45, सिद्धेश्वर मंदिराजवळ, खडका रोड, भुसावळ) या 1 रोजी रात्री 10 वाजता रस्त्यावरून पायी चालत असताना अज्ञात दोघा आरोपींनी त्यांच्या हातातील आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवून पोबारा केला. या बाजारपेठ पोलिसात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास ईरफान काझी करीत आहेत.
भुसावळात आतापर्यंत झालेल्या दृष्टीक्षेपातील घरफोड्या
भुसावळ कोषागार कार्यालयातील ज्यु.कारकून संगीता सुरेश इंगळे यांच्या घरातून सोमवार, 13 मे रोजी भर दिवसा चोरट्यांनी 17 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला
भुसावळातील आठवडे बाजारातील आडत दुकानदार विजयकुमार चंद्रलाल लोकवाणी (49, गणेश कॉलनी, खडका) यांच्या आठवडे बाजारातीन दुकानातून रविवार, 19 मे रोजी 99 हजार 700 रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली
भुसावळात लग्नासाठी आलेल्या प्रमिला महाजन (रा. बिदाली, छत्तीसगड) यांचे प्रभाकर हॉलजवळून धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवण्याची घटना गुरुवार, 23 मे रोजी घडली
जळगावच्या विवाहिता हर्षाली सचिन पाटील यांची टरावेर-बारामती बसमध्ये बसलेल्या भामट्यांनी भुसावळ आल्यानंतर गुरुवार, 23 मे रोजी लांबवली
भुसावळातील नाहाटा महाविद्यालयाजवळील श्रीराम हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी अरुणा रडे यांच्या घरातून शुक्रवार, 24 मे रोजी एक लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला
भुसावळातील रींग रोड, पटेल कॉलनीतील रहिवासी अक्षय राजेंद्र रोकडे यांच्या बंद घरातून मंगळवार, 27 मे रोजी दोन लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली
भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथे शुक्रवार, 31 मे रोजी रात्री चाकूच्या धाकावर चोरट्यांनी पाच हजारांची लूट करीत दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला