चोरट्यांनी केली सुरक्षा रक्षकाची हत्या

0

भिवंडी । यंत्रमाग कारखान्यात केलेल्या चोरीचा पुरावा नष्ट करण्यासाठी सुरक्षा रक्षकाची हत्या करून चोरटयांनी कारखान्यातील किमंती सामान पळवून नेल्याची घटना भिवंडी शहरालगतच्या खोणी गावात घडली आहे. गुरूदेव पांडे (37) असे चोरट्यांनी हत्या केलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.

भिवंडीतील खोणी (मीठपाडा) गावातील रिद्धीसिद्धी कंपाऊंडमध्ये अशोका टेक्सटाईल यंत्रमाग कारखाना आहे. काल रात्रीच्या वेळी चोरी करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी कारखान्याच्या मागील बाजूस भगदाड पाडण्यास सुरूवात केली. याची कुणकूण सुरक्षा रक्षक गुरूदेव पांडे यास लागल्याने त्याने चोरट्यांना विरोध केला. त्यावेळी चोरांनी त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी लोखंडी पाण्याची मोटार त्याच्या डोक्यात मारून त्याची हत्या केली. दरम्यान कारखान्याच्या मागील पाडलेल्या भगदाडातून चोर कार्यालयात शिरले आणि त्यांनी कार्यालयातील एलईडी टिव्ही, डीव्हीआर मशीन, सीसीटिव्ही कॅमेरा, कॉम्प्रेसर पंप आणि वायरबंडल असे 92 हजार किमतीचे सामान चोरून नेले.कारखान्याचे व्यवस्थापक शंकर सिताराम सिंग हे कारखान्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तेव्हा त्यांनी ही घटना निजामपूर पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि सुरक्षा रक्षकाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षकाच्या हत्येबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो. नि. आर. के. कोते करत आहे.