शहादा । तालुक्यातील ब्राम्हणपुरी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून चोर्यांचे प्रमाण वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी 24 नोव्हेंबरच्या रात्री ब्राह्मणपुरी येथून मोटारसायकल लंपास करून दोन्ही चाके, डिस्क, बॅटरी व पेट्रोलची चोरी करून रायखेडजवळील नदीत फेकून दिल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. ब्राह्मणपुरी येथील राजाराम उखा पाटील यांची मोटारसायकल (क्रमांक एम.एच.39 के-1970) शुक्रवारी रात्री अंगणात उभी होती. चोरट्यांनी ही मोटारसायकल रात्रीतून लंपास केली. चोरट्यांनी रायखेड शिवारातील सुकनाई नदीत मोटारसायकल नेवून दोन्ही चाके, डिस्क, बॅटरी व पेट्रोल काढून घेतले व मोटारसायकल तेथेच सोडून पलायन केले.
शनिवारी सकाळी राजाराम पाटील यांना अंगणात मोटारसायकल न दिसल्यान त्यांनी शोधाशोध सुरू केली. ब्राम्हणपुरी येथील शेतकरी आपल्या रायखेड शिवारातील शेतात गेले असता त्यांना दोन्ही चाके काढलेली मोटारसायकल नदीत दिसली. त्यांनी याबाबत ब्राम्हणपुरी येथे संपर्क करून ही माहिती दिली. त्यानंतर राजाराम पाटील हे तेथे गेले असता त्यांना मोटारसायकलीची दोन्ही चाके, बॅटरी, डिस्क व पेट्रोल काढल्याचे दिसले. या मोटारसायकलीतून 16 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेवून मोटारसायकल तेथेच फेकून दिली. ब्राह्मणपुरी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून चोर्यांचे प्रमाण वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून चोरट्यांंचा तपास लागत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.