Thieves stole 16,000 cash from a woman from Bank of Baroda: Case in Shahada शहादा : शहरातील बँक ऑफ बडोदात कर्मचारी कामात गर्क असताना चोरट्यांनी ग्राहक महिलेच्या पिशवीतून 16 हजार रुपयांची रोकड लांबवली. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
संधीचा फायदा घेत लांबवली रोकड
सोमवार, 28 नोव्हेंबरला कलमाडी, ता.शहादा येथील जिजाबाई जगन्नाथ राहुर या शहरातील बँक ऑफ बडोदा शाखेतून पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी त्यांच्या बँक खात्यातून 16 हजार रुपयांची रोकड काढून त्यांच्याजवळ असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवली. कॅश काऊंटरवरच पैशांची स्लिप भरत असताना संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पिशवीला साईडने धारदार ब्लेडने कापून पिशवीत ठेवलेले 16 हजारांची रोकड चोरून नेली.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध
महिलेने पिशवीत हात टाकून पाहिला असता पिशवीत बँकेतून काढलेले 16 हजार रुपये मिळाले नाहीत. पिशवीला बाजूने ब्लेडच्या साह्याने कापून कोणीतरी पैसे चोरल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बँकेत अधिकार्यांना लागलीच माहिती दिली. या घटनेने जिजाबाई यांना आपले अश्रू अनावर झाले. बँकेच्या अधिकार्यांनी लागलीच सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोराचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासणी करायला सुरुवात केली तर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.