पुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, प्रसिद्ध साहित्यिक दिवंगत पु. ल. देशपांडे यांची पुण्यातील दोन बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. परंतु, घरातील कपाटांची उचकपाचक केल्यानंतरही चोरट्यांना त्यात काही मिळाले नाही, त्यामुळे चोरटे खाली हात परतले. भांडारकर रोडवर मालती माधव या इमारतीत पु. ल. देशपांडे रहायला होते. सध्या तेथे कोणीही राहत नाही. पहाटे दोनच्या सुमारास ही चोरीची घटना घडली असावी, असे पोलिसांनी सांगितले. पुलंचे भाचे दिनेश ठाकूर हे अमेरिकेला असतात. अमेरिकेहून ते मंगळवारी पहाटे मुंबईला आले व तेथून ते सकाळी पुण्यात दाखल झाले तेव्हा हा प्रकार निदर्शनास आला. बंद घर पाहून चोरट्यांनी ते फोडून आत चोरी करण्याचा प्रयत्न केला. घरातील कपाटांमध्ये उचकपाचक केली. परंतु, तेथे त्यांना काहीही मिळाले नाही. आसपासच्या तीन ते चार ठिकाणीदेखील घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे पोलिसांना दिसून आले आहे. घटनेची माहिती मिळताच डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व गुन्हे दाखल केले आहेत.
घरात हस्तलिखिते व पुस्तकेच!
पुलंच्या दोन सदनिका आणि शेजारच्या दोन बंद सदनिकांची कड्या-कुलुपे तोडल्याचे पाहून परिसरातील सगळेच हादरले होते. पुलंच्या घरातील पुस्तके आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. सीसीटीव्ही उलट दिशेला फिरवून ठेवले होते. मात्र, घरात हस्तलिखिते आणि पुस्तकांशिवाय काहीच नसल्याने चोरटे रिकाम्या हातीच परतले. चोरट्यांनी घरातील सर्व सामानाची उलथापालथ करून रोख पैसे किंवा काही मौल्यवान वस्तू सापडतात का याचा शोध घेतला. परंतु, त्यांना तसे काहीच सापडले नाही. सद्यातरी घरातून काय चोरीला गेले आहे, याबाबत सांगता येणार नसल्याचे पुलंचे भाचे दिनेश ठाकूर यांनी सांगितले. पुलंच्या निधनानंतर 2009 मध्ये त्यांच्या पत्नी सुनीताताई यांचेही निधन झाले आहे. त्यानंतर त्यांचे हे घर बंदच असते. कधी तरी ठाकूर हे येथे येत असतात. बंद घर पाहून यापूर्वी चोरट्यांनी एप्रिल 2012 मध्ये घरात शिरुन चोरीचा प्रयत्न केला होता. तेव्हादेखील चोरट्यांनी घरातील पुस्तके अस्ताव्यस्त करुन टाकली परंतु त्यांना काहीही मिळाले नव्हते़
सीसीटीव्ही कॅमेर्यांची दिशा बदलली
चोरट्यांनी याच इमारतीमधील अन्य तीन सदनिकाही फोडल्या आहेत. या सदनिकांतील किती ऐवज चोरीला गेला याचा डेक्कन पोलिस शोध घेत होते. पु. ल. देशपांडे यांच्या घरात त्यांचे भाचे दिनेश ठाकूर राहात असतात. पोलिसांनी शोध घेतला असता इमारतीमधील सीसीटीव्हीमध्ये चोरटे दिसत आहेत. घरफोडी करण्यापूर्वी चोरट्यांनी इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेर्यांची दिशा बदलली होती. शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये सध्या वाढ झाली असून, उपनगरांमध्ये दररोज किमान 3 ते 4 घरफोडीचा घटना होताना दिसत आहेत. या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांना गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी त्या रोखण्यात अजून तरी पोलिसांना यश आलेले दिसून येत नाही़