चोरट्यांनी हॉटेल, घर फोडले

0

जळगाव । एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी चोर्‍या झाल्याच्या घटना बुधवारी उघडकीस आल्या आहेत. पहिल्या घटनेत ईच्छादेवी चौफुलीजवळ असलेल्या आर्यन रेस्टॉरंट चोरट्यांनी फोडून गल्लयातून 21 हजारांची रोकड लांबविली आहे. तर दुसर्‍या घटनेत मेहरूण येथील घराचे कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी लाकडी कपाट फोडत त्यातील 53 हजार रुपांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हॉटेल व घरमालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातच पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी देखील केली आहे.

दाराची फळी तोडून केला प्रवेश
सम्राट कॉलनी येथील रहिवासी आशिष सुभाष पाटील (वय-29) यांचे शहरातील ईच्छादेवी चौफुलीजवळ आर्यन रेस्टॉरंट हॉटेल आहे. ही हॉटेल आशिष पाटील व त्यांचे वडील सांभाळतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी आशिष पाटील व त्यांचे वडील सकाळी 6 वाजता नोकरास हॉटेलात आले. यानंतर रात्री 8 वाजता काम संपणून घरी निघून गेले. यानंतर चोरट्यांनी पाटील यांच्या हॉटलेच्या मागील बाजूच्या लाकडी दरवाज्याची फळी तोडून आत प्रवेश केला. यानंतर गल्लयातील 21 हजार रूपयांची रोकड घेवून पोबारा केला.

सकाळी 6 वाजता उघडकीस आली घटना
दुसर्‍या दिवशी आज बुधवारी सकाळी 6 वाजता आशिष पाटील हे वडीलांसोबत हॉटेल उघडण्यासाठी आल्यावर त्यांना हॉटेलचे शर्टर अर्धे उघडे दिसले. आत जावून पाहिल्यानंतर मागील खोलीतील दरवाज्याची फळी तोडलेली दिसून आली. यानंतर काऊंटर ड्रावरातील गल्ला तपासल्यानंतर त्यातील व्यावसायचे तीन हजार रूपये व माल खरेदी करण्यासाठी ठेवलेले 18 हजार रूपये असे एकूण 21 हजार रूपयांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याची दिसून आले. आशिष पाटील यांनी लागलीच एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत संपूर्ण हकीकत सांगितली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. मात्र, चोरट्यांबाबतचा कोणताही पुरावा पोलिसांना मिळून आला नाही. यानंतर आशिष पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंद घर पाहून चोरट्यांनी साधली संधी; दागिने लंपास
दुसर्‍या घटनेत मेहरूण परिसरातील गणेशपुरी येथील रहिवासी नफिसा नाहीद देशमुख यांच्या घरात डल्ला मारीत चोरट्यांनी 53 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नफिसा देशमुख ह्या मेहरूण येथील गणेशपुरी येथे राहतात. परंतू गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून त्या मुंबई येथे नोकरीस असलेली मुलगी रूही देशमुख हिला भेटण्यासाठी गेलेल्या आहेत. त्यामुळे घरी कुणीही नव्हते. मात्र, साफसफाईसाठी मुन्नीबी महमंद शरीफ ही महिला देशमुख यांच्या घरी रोज ये-जा करीत असते. त्यामुळे घरी कुणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी देशमुख यांच्या घराच्या दराचे कडी-कोयंडा तोडून कपाटातील दागिने तसेच रोकड असे एकूण 53 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले. आज बुधवारी सकाळी 8.30 वाजता देशमुख यांच्या घरी कुरीअरवाला आल्याने शेजारी राहणार्‍या सुलोचना रविंद्र पाटील यांनी नफिसा देशमुख यांना फोन करून तुम्ही घरी आले आहेत का? कुरीअरवाला आला आहे. देशमुख यांनी घरी नसल्याचे सांगितल्यानंतर सुलोचना पाटील यांनी घराचे दार तर उघडे आहे अशी माहिती त्यांना दिली. यानंतर सुलोचना पाटील यांनी हाजी शेख अशरफ शेख शौकत यांना बोलवून घर पाहिले. त्यावेळी त्यांना घरात चोरी झाल्याचे समजताच त्यांनी देशमुख यांना कळविले. देशमुख यांनी त्यांच्या ओळखीचे वकील रहिम शेख मोहमंद पिंजारी यांना घरी जावून पाहणी करण्यासाठी सांगितले. अ‍ॅड. पिंजारी यांनी देशमुख यांच्या घरी येवून पाहणी केली असता घराचे कडी-कोंयडा तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर लाकडी कपाट फोडलेले आढळून आले व त्यातील 50 हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या 10 ग्रॅम वजनाच्या 2 अगठ्या, 3 ग्रॅम वजनाचे टॉप्स तसेच 2 हजार रूपयांची रोकड व 1 हजार 600 रूपयांची चिल्लर असे एकूण 53 हजार 600 रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले. यानंतर अ‍ॅड. पिंजारी यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.