नवी मुंबई । मोटारसायकल चोरी करणार्या चार सराईतांना अटक करून त्यांच्याकडून नवी मुंबईतील 9 तर ठाण्यातील 2 असे एकूण 11 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी 12 चोरीचे मोटारसायकल हस्तगत केले आहेत. कळंबोली स्टील मार्केट भागात मोटारसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लाऊन गोटीराम शंकर वाघे (22) याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची अधिक चौकशी केली असता त्याने दिनेश जनार्दन हातमोडे यांच्यासह नवी मुंबई आणि ठाण्याच्या हद्दीत चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी वाघे याच्याकडून चार मोटारसायकली हस्तगत करून पनवेल, कळंबोली आणि ठाण्यातील हिल लाईन पोलीसात असे तीन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. या प्रकरणातील आरोपी गोटीराम वाघे याचा साथीदार दिनेश हातमोडे याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपी दिनेश व त्याचा साथीदार कृष्णा भोईर या दोघांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली. तसेच त्याच्याकडून चोरीची एक मोटारसायकल हस्तगत करून डायघर पोलीसात मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.